बेळगाव जिल्ह्यातील 13 तालुक्यांचा समावेश : महसूल खात्याकडून घोषणा : राज्यातील 195 तालुक्यांची यादी
बेंगळूर : दोन आठवड्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर राज्य सरकारने दुष्काळग्रस्त तालुक्यांची अधिकृत घोषणा केली आहे. 2023 या वर्षी खरीप हंगामात 31 जिल्ह्यांमधील 236 पैकी 195 तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती आहे. यापैकी 161 तालुके तीव्र दुष्काळग्रस्त तर 34 तालुके दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करण्यात आले आहेत. महसूल खात्याने गुरुवारी यासंबंधीचा आदेश जारी केला आहे. बेळगाव जिल्ह्यातील 15 तालुक्यांपैकी बेळगाव आणि खानापूर वगळता इतर 13 तालुक्यांना तीव्र दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आले आहे.
मंत्रिमंडळ उपसमितीने बुधवारी पाचवी बैठक घेत एकूण 195 तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची शिफारस केली होती. त्यानुसार सरकारने 161 तालुके तीव्र दुष्काळी आणि 34 तालुके साधारण दुष्काळी असल्याची घोषणा केली आहे. त्यात बेळगाव जिल्ह्यातील अथणी, बैलहोंगल, चिकोडी, गोकाक, हुक्केरी, रामदुर्ग, रायबाग, सौंदत्ती, कित्तूर, निपाणी, कागवाड, मुडलगी, यरगट्टी या 13 तालुक्यांचा तीव्र दुष्काळी यादीत समावेश करण्यात आला आहे. हा आदेश पुढील सहा महिन्यांच्या कालावधीसाठी किंवा पुढील आदेशापर्यंत जारी राहणार आहे. राज्यात पावसाअभावी दुष्काळ पडला आहे. दुष्काळासंबंधी महसूल आणि कृषी खात्याने संयुक्तपणे सर्वेक्षण केले होते. केंद्र सरकारच्या दुष्काळ व्यवस्थापन नियमावली 2020 नुसार मार्गदर्शक तत्वांच्या निकषांच्या आधारे जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या सर्वेक्षणानुसार दुष्काळी तालुक्यांची यादी तयार करण्यात आली होती. या सर्वेक्षणासाठी व दुष्काळी तालुके निश्चित करण्यासाठी राज्य सरकारने महसूलमंत्री कृष्णभैरेगौडा यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती नेमली होती. या उपसमितीच्या आतापर्यंत 5 बैठका पार पडल्या आहेत. बुधवारच्या बैठकीत दुष्काळी तालुक्यांच्या घोषणेबाबत मुख्यमंत्र्यांकडे शिफारस करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर गुरुवारीच अधिकृतपणे यासंबंधी घोषणा करण्यात आली आहे.
125 वर्षातील सर्वात कमी पाऊस
यंदा मान्सूनचे आगमन एक आठवडा विलंबाने झाले. जून महिन्यात पावसाने ओढ दिली. परिणामी 56 टक्के पावसाची कमतरता भासली. जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस झाला. हा पाऊस अंदाजापेक्षा 29 टक्के अधिक होता. मात्र, त्यानंतर ऑगस्ट महिना कोरडाच गेला. या महिन्यात 73 टक्के पावसाची कमतरता होती. हा गेल्या 125 वर्षातील सर्वात कमी पाऊस आहे.
40 तालुक्यात कृषी विद्यापीठांमार्फत पुन्हा सर्वेक्षण
राज्यातील 40 तालुक्यांमध्ये अपेक्षित पाऊस झालेला नाही. परंतु, केंद्र सरकारच्या निकषांनुसार हे तालुके दुष्काळग्रस्त घोषित करणे शक्य नाही. त्यामुळे 4 कृषी विद्यापीठे आणि 1 बागायत विद्यापीठाला या तालुक्यांचे सर्वेक्षण करून 10 दिवसांत अहवाल देण्याची सूचना बुधवारच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत करण्यात आली. होती. सदर अहवाल आल्यानंतर मंत्रिमंडळ उपसमितीची पुन्हा बैठक घेऊन दुष्काळी तालुके निश्चित केले जातील. त्यामुळे खरीप हंगामातील दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या संख्येत भर पडण्याची शक्यता आहे.
मदतनिधीसाठी केंद्राकडे विनंती करणार : सिद्धरामय्या
राज्यातील 195 तालुक्यांमध्ये भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे तातडीने मदतनिधी मंजूर करण्यासाठी केंद्र सरकारकडे विनंती केली जाईल, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले. मंत्रिमंडळ उपसमितीने 195 तालुके दुष्काळी असल्याची शिफारस केली आहे. त्यानुसार लवकरच अहवाल तयार करून केंद्राकडे मदतीसाठी विनंती केली जाईल. मागील आठवड्यात राज्यभरात पीक सर्वेक्षण करण्यात आली होते. केंद्राच्या मार्गसूचीनुसार राज्यातील 161 तालुके तीव्र दुष्काळी यादीत आहेत. शिवाय उर्वरित 34 तालुक्यांमधील परिस्थितीही गंभीर आहे. या तालुक्यांसाठी केंद्राची मार्गसूची लागू होत नसली तरी या तालुक्यांना दुष्काळग्रस्त यादीत समाविष्ट करण्यात आले आहे, अशी माहितीही सिद्धरामय्यांनी दिली.
बेळगाव जिल्ह्यातील तीव्र दुष्काळी तालुके
- अथणी
- बैलहोंगल
- चिकोडी
- गोकाक
- हुक्केरी
- रामदुर्ग
- रायबाग
- सौंदत्ती
- कित्तूर
- निपाणी
- कागवाड
- मुडलगी
- यरगट्टी
कारवार जिल्ह्यातील दुष्काळी तालुके तीव्र दुष्काळ
- हल्ल्याळ
- मुंडगोड
- शिरसी
- यल्लापूर
साधारण दुष्काळ
- अंकोला
- भटकळ
- कारवार
- कुमठा
- जोयडा









