वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पश्चिम बंगालची राजधानी कोलकाताच्या आकाशात मंगळवारी रात्री ते बुधवारी पहाटे या काळात ड्रोन्स किंवा ड्रोन्स सदृश वस्तू आढळल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकाराचा शोध घेण्यास प्रारंभ केला आहे. हे ड्रोन्स हेरगिरी करण्यासाठी पाठविण्यात आले होते काय, तसेच दहशतवादी हल्ला करण्याचा हा प्रयत्न होता काय, असे प्रश्न निर्माण झाले असून, त्या संबंधांमध्येही चौकशी केली जात आहे. सर्व शक्यता गृहित धरुन तपास केला जाणार आहे.
कोलकाता शहराच्या हस्टिंग विभाग, विद्यासागर सेतू आणि मैदान भाग येथील आकाशात ही ड्रोन्स आढळून आली होती. सोमवारी रात्रीही असा प्रकार घडला होता. ही ड्रोन्स कोणी पाठविली होती आणि ती पाठविण्याचा उद्देश कोणता होता, याचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. बांगलादेशने हा प्रकार केला आहे काय, याचाही तपास केला जाणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.
केंद्राने मागविला अहवाल
ही ड्रोन्स किंवा तत्सम वस्तू यांच्यामुळे कोणतीही हानी झालेली नाही. तसेच, अशी कोणतीही वस्तू भूमीवर आदळलेली नाही. तसेच कोणत्याही अशा वस्तूचा आकाशात किंवा भूमीवर स्फोट झालेला नाही. त्यामुळे ही साधने हेरगिरी करण्यासाठी किंवा आकाशातून टेहळणी करण्यासाठी पाठविलेली असावीत असे अनुमान आहे. हे काम चीन किंवा पाकिस्तान या देशांचे असू शकते ही शक्यताही तपासाच्या संदर्भात विचारात घेण्यात आली आहे. केंद्र सरकारने पश्चिम बंगालच्या राज्य सरकारकडे या विषयीचा अहवाल त्वरित मागविला आहे.
आढळल्या 10 वस्तू
सोमवार ते बुधवार या कालावधीत अशा 10 वस्तू आकाशात तरंगताना दिसून आल्या होत्या. साधारणत: 1 तासानंतर त्या दिसेनाशा झाल्या. ती खासगी व्यक्तींनी सोडलेली ड्रोन्स असावीत असेही अनुमान आहे. तथापि, अशी मोठी ड्रोन्स सोडण्यास संबंधित विभागाची अनुमती घ्यावी लागते. तशी ती घेतल्याची नोंद नसल्याने संशयाला जागा निर्माण झाली असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
भूसेनेच्या पूर्व कमांडचे मुख्यालय
कोलकाता येथे भारतीय भूसेनेच्या पूर्व कमांडचे मुख्यालय आहे. या मुख्यालयाच्या जवळच्या भागात या उडत्या वस्तू आढळून आल्याने तो विशेष चिंतेचा विषय बनला आहे. सध्या बांगलादेशमध्ये कट्टर धर्मवाद प्रस्थापित होत आहे. तसेच पाकिस्तान आणि बांगलादेश यांचे संबंधही वाढू लागले आहेत. त्यामुळे पाकिस्तान भारताच्या सिंदूर अभियानाला बांगलादेशच्या भूमीचा उपयोग करुन प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे काय, हा प्रश्नही महत्त्वाचा आहे. पश्चिम बंगालच्या विशेष कृती दलाने या संबंधातील चौकशी चालविली आहे. केंद्र सरकारलाही या घटनांची सविस्तर माहिती दिली जाणार आहे. अशा वस्तू पुन्हा आढळल्यास ती पाडविण्यासाठी आवश्यक यंत्रणा कोलकाता शहरात आहे. तसेच नागरिकही सरकारला सहकार्य करण्यात तयार आहेत, असे स्पष्ट करण्यात आले.









