बटाटे उत्पादक शेतकरी औषध फवारणीच्या कामात : शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा
वार्ताहर/कडोली
रिमझिम पावसामुळे बहरात आलेल्या बटाटे पिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव होत असून बटाटे उत्पादक शेतकरी औषध फवारणीच्या कामात गुंतला आहे. कडोली परिसरातील शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. पाणी निचरा होणाऱ्या शेतजमिनीतील बटाटा पीक बहरला आहे. तर अति पावसामुळे पाणथळ जमिनीतील बटाटा बियाणे कुजून खराब झाल्याने काही शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. तर लाल जमिनीतील बटाटा पीक चांगले बहरले आहे. त्यामुळे समाधानाची बाब असतानाच आता सुरू असलेल्या रिमझीम पावसामुळे मात्र यावर विरजन पडले आहे. या रिमझीम पावसामुळे बटाटा पिकावर रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी औषध फवारणीच्या कामाला जोर केला आहे. गेल्या दहा-बारा दिवसांपासून पावसाचे प्रमाण एकदम झाल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. माळजमिनीतील भुईमूग, मका, रताळी, बटाटे यांना मोठ्या पावसाची गरज आहे. आता लवकरात लवकर मोठा पाऊस झाल्यास बटाट्याचे समाधानकारक उत्पादन निघण्याची आशा शेतकरी करीत आहेत. यावर्षी बटाटे लागवडीत 75 टक्क्यांनी घट झाली असून रताळी लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे.
खते, औषधे महाग शेतकरी हैराण
प्रत्येक वर्षी खते, औषधांच्या किंमतीत वाढ होत आहे. त्यामुळे शेती व्यवसाय कोलमडला आहे. पिकांच्या उत्पादनात आणि दरात कोणतीच वाढ होत नाही. मागील उन्हाळी हंगामात घेतलेल्या पिकांत मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे याची झळ पावसाळी पिकांसाठी जाणवत आहे. आता पिकांसाठी खते, औषधे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना पैशांची कमतरता आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे.









