अष्टेनजीक वृद्धाला दिली होती धडक
बेळगाव : अपघातानंतर आडवळणावर आपले वाहन लपवून ठेवून पलायन करणाऱ्या वाहनचालकाला मारिहाळ पोलिसांनी चार तासांत अटक केली आहे. त्याच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. शनिवार दि. 19 जुलै रोजी रात्री गुड्स वाहनाची धडक बसून महादेव कऱ्याप्पा लोहार (वय 82) या पादचाऱ्याचा मृत्यू झाला होता. बेळगाव-गोकाक रोडवरील अष्टेजवळ ही घटना घडली होती. अपघातानंतर आपले केए 63/8857 क्रमांकाच्या गुड्स वाहनासह चालकाने पलायन केले होते.
घटनास्थळापासून एक किलोमीटर अंतरावर जाऊन मुचंडी येथील श्री सिद्धेश्वर देवस्थानाजवळील एका रस्त्यावर आपले वाहन उभे करून चालक संजीवकुमार मल्लिनाथ जिडगे, राहणार तडोला, ता. आळंद, जि. गुलबर्गा याने पलायन केले होते. मारिहाळचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ नायक व त्यांच्या सहकाऱ्यांनी पाठलाग करीत अपघातग्रस्त वाहन व फरारी चालकाला ताब्यात घेतले. गुड्स वाहनाचे मालक शंकर भैरू परसूचे, राहणार पाटील गल्ली, होनगा याच्यावरही मारिहाळ पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. अपघातानंतर केवळ चार तासांत फरारी चालक व वाहनाला ताब्यात घेण्यात पोलीस निरीक्षक मंजुनाथ नायक, हायवे पेट्रोलिंगचे बी. एस. नायक, ए. पी. बोम्मण्णावर, मारिहाळ पोलीस स्थानकातील मंजुनाथ बडीगेर, आर. एस. तळेवाड, आर. एस. तळवार आदींनी वाहनासह चालकाला ताब्यात घेतले आहे.









