वैभववाडी /प्रतिनिधी
करूळ घाटात डंपर दरीत कोसळून झालेल्या अपघातात चालक जागीच ठार झाला आहे. मृत चालकाचे नाव सचिन चौगुले असल्याचे समजते. शनिवारी पहाटे ५.०० वाजताच्या सुमारास घाटातील पहिल्या विश्रांती थांब्यानजीकच्या माणगीचा टेप येथे हा अपघात घडला.
कोल्हापूर येथील राहुल मुळे यांच्या मालकीचा डंपर चालक सचिन चौगुले कासार्डे ता. कणकवली येथून वाळू भरून कोल्हापूरच्या दिशेने जात होता. डंपर करुळ घाटातील पहिल्या विश्रांती थांब्यानजीकच्या धोकादायक वळणावर आल्यानंतर चालकाचा गाडीवरील ताबा सुटून डंपर 80 फूट खोल दरीत कोसळला.
या अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे, पोलीस हवालदार नितीन खाडे, पोलीस नाईक राहुल पवार वाहतूक पोलीस रमेश नारनवर,अजित पडवळ यांनी घटनास्थळी धाव घेतली.या अपघातानंतर चालक केबिन मधून बाहेर पडून डंपरच्या चाकाखाली अटकला. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. चाकाखाली अटकलेल्या चालकाला बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी क्रेन मशीनला पाचरण केले. मात्र आलेल्या क्रेनची क्षमता नसल्याने त्याचा काही उपयोग झाला नाही. यावेळी पोलिसांनी कोल्हापूर येथून दुसऱ्या क्रेन मशीनला पाचरण केले.
अपघाताची माहिती मिळताच करुळ येथील सह्याद्री जीव रक्षक दल घटनास्थळी दाखल झाले. कोल्हापूर येथून क्रेन येण्यास विलंब होणार असल्याने जीव रक्षक दलाच्या कार्यकर्त्यांनी चालक अडकलेल्या ठिकाणी जमिनीला खड्डा मारून चालकाचा मृतदेह बाहेर काढला. चालकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला आहे. या अपघाताची नोंद करण्याचे काम पोलीस ठाण्यात सुरू आहे.









