टायर फुटून दुर्घटना : मृत दड्डीचा रहिवासी
वार्ताहर/यमकनमर्डी
दड्डीहून बेळगावकडे निघालेल्या इको कारचा टायर फुटल्याने वाहन नदीपात्रात कोसळले. दरम्यान, पाण्याच्या प्रवाहात वाहनाचा दरवाजा न उघडल्याने कारमधील चालकाचा मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी पहाटेच्या सुमारास घडला. पोलिसांनी कार नदीपात्रातून बाहेर काढली असून किरण लक्ष्मण नावलगी (वय 45 रा. दड्डी ता. हुक्केरी) असे मृत कारचालकाचे नाव आहे. सोमवारी अमावस्या असल्याने फुले खरेदी करण्यासाठी किरण कार घेऊन पहाटेच्या सुमारास बेळगावकडे निघाले होते. घटप्रभा नदीकाठी येताच अचानक कारचा टायर फुटल्याने वाहनावरील नियंत्रण सुटून कार नदीपात्रात कोसळली. किरणला पोहता येत होते पण पाण्याच्या दाबामुळे कारचे दार न उघडल्याने गुदमरून त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच यमकनमर्डी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन क्रेनच्या साहाय्याने कार नदीतून बाहेर काढली. किरणच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.









