ते धोकादायक वळण काढण्याची मागणी
कणकवली : वार्ताहर
महामार्गावरील येथील हळवल फाटा येथील अवघड वळणावर सातत्याने होणारे अपघात आता सर्वांसाठीच डोकेदुखी बनले आहेत . गुरुवारीही दुपारी १२ वा. सुमारास मुंबईतून गोव्याच्या दिशेने जाणारा टँकर वळणाचा अंदाज नआल्याने कलंडला. अपघातात टँकरचालक मधूसुदन यादव (४५, उत्तरप्रदेश) हा जखमी झाला. अपघातानंतर टँकरची आईल टाकी फुटल्याने महामार्गाच्या बाजूला सर्वत्र ऑईल सांडले होते. तर डाव्या कुशीवर कलंडल्यानंतर टँकरची टाकीही टँकरपासून अलग होऊन बाजूला पडली होती. अपघातानंतर कणकवली पोलीस ठाण्याचे निरीक्षक अमित यादव, महामार्ग पोलीस विभागाचे उपनिरीक्षक रामचंद्र गोसावी आपापल्या सहकाऱ्यासह घटनास्थळी दाखल झाले होते. जखमी चालक मधूसूदन यादव याला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान हळवल फाटा येथील ते धोकादायक वळण सातत्याने अपघातांना निमंत्रण देत असून तेथे अनेकांचा मृत्यूही झाला आहे. हे वळण काढण्याबाबत संबंधित विभागाने त्वरीत कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.









