पार्सलसाठी नागरिकांकडून वसुली
बेळगाव : वायव्य परिवहन मंडळाची स्वतंत्र पार्सल व्यवस्था असतानाही ड्रायव्हर व कंडक्टर यांच्यामुळे परिवहन मंडळाचा लाखोंचा महसूल बुडत आहे. पार्सल सेवेऐवजी ड्रायव्हर व कंडक्टरकडे पार्सल, लिफाफे, औषधे, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, पुस्तके दिली जात आहेत. त्यांना पैसे दिल्यास एका गावाहून दुसऱ्या गावी वस्तूंची वाहतूक केली जात असल्याने महसूल बुडत असल्याची तक्रार होत आहे. परिवहन मंडळाकडून पार्सलसाठी स्वतंत्र कार्गो यंत्रणा कार्यरत आहे. ज्याप्रकारे रेल्वेची मालवाहतूक चालते, त्याच धर्तीवर परिवहन मंडळाची मालवाहतूक चालते. परंतु मागील अनेक वर्षांपासून कंडक्टर अथवा ड्रायव्हर यांच्या ताब्यात एखादी वस्तू सोपवून वाहतूक केली जाते. केवळ लहानसहान गोष्टीच नाही तर बेळगाव बसस्थानकातून खायची पाने, फुले, औषधे, लिफाफे, इलेक्ट्रॉनिक वस्तू यांचीदेखील वाहतूक करण्यात येते.
विशेष म्हणजे एखाद्यावेळी पार्सल घेणारी व्यक्ती वेळेत आली नाही तर बस काऊंटरवर ती वस्तू ठेवली जाते. एकीकडे बसस्थानकात पार्सल सेवेबाबत माहिती दिलेली असते तर दुसरीकडे अनधिकृतरित्या पार्सलची वाहतूक सुरू असते. हुबळी येथील एका सामाजिक कार्यकर्त्याने हुबळी-बेळगाव मार्गावरील एका ड्रायव्हरकडे एक लिफाफा बेळगावपर्यंत पोहोचविण्यासाठी दिला होता. यावेळी त्यांनी 100 रुपयांची मागणी केली. पैसे देतो परंतु त्याची पावती द्यावी, असे सांगताच त्या ड्रायव्हरने लिफाफा नेण्यास नकार दिला. अशा प्रकारांमुळे परिवहन मंडळाच्या महसुलावर परिणाम होत आहे. बेळगाव शहरातून आजरा, सावंतवाडी, कोल्हापूर, पुणे या मार्गावर सर्वाधिक मालवाहतूक केली जाते. काहीवेळा तर फुले, पानांच्या बुट्ट्यांमुळे बसमध्ये बसण्यासही जागा उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी प्रवाशातून होत आहेत. काहीवेळा पार्सलचे स्वतंत्र तिकीट काढले जाते तर काहीवेळा ड्रायव्हर, कंडक्टरला चिरीमिरी देऊन वाहतूक करण्यात येत आहे. हे प्रकार थांबविण्यासाठी वायव्य परिवहन मंडळाने मालवाहतुकीसाठी जागृती करण्यास सुरुवात केली असून यासाठी स्वतंत्र मोबाईल क्रमांक जाहीर केला आहे.









