हिंदू जनजागृती समितीचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
राजस्थानमधील उदयपूर येथे कन्हैयालाल या हिंदू युवकाची जिहाद्यांनी हत्या केली. यामुळे संपूर्ण देश हादरला आहे. हा लोकशाहीवरच घाला असून अशा समाजविघातक प्रवृत्तीच्या व्यक्तींवर बुलडोझर फिरवा, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीच्यावतीने जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
उदयपूर येथील कन्हैयालाल या टेलरच्या दुकानामध्ये दोन जिहादी ग्राहक म्हणून शिरले. त्यानंतर त्यांनी त्यांची हत्या केली. हत्या करणे हा कोणता धर्म? तेव्हा अशा धर्माला देशात थारा देता कामा नये, असेही या निवेदनात म्हटले आहे. देशाला जिहाद्यांपासून मुक्त करण्यासाठी केंद्र सरकारने सैन्याला मोकळीक द्यावी, अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे.
नुपूर शर्मा यांचे समर्थन करणारी पोस्ट सोशल मीडियावर प्रसारित केली म्हणून कन्हैयालाल याचा निर्घृण खून करण्यात आला. वास्तविक, पोलिसांनी त्यांना संरक्षण देणे गरजेचे होते. मात्र दुर्लक्ष केल्यामुळे ही घटना घडली असून जिहाद्यांना आता धडा शिकविण्याची वेळ आली आहे. तेव्हा केंद्र सरकारने त्यासाठी पाऊल उचलावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
महसूल अधिकारी एस. एम. परगी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सदा मासेकर, रमेश शिंदे, मारुती सुतार, विजय नंदगडकर, आक्काताई सुतार, मिलन पवार, मनोहर शिरोडकर, मंजू मिराशी यांच्यासह हिंदू जनजागृती समितीचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.









