कंग्राळी बुद्रुक ग्राम.पंचायतीचे अक्षम्य दुर्लक्ष : शुद्ध पाणीपुरवठा करण्याची मागणी
वार्ताहर/कंग्राळी बुद्रुक
येथील लक्ष्मी गल्लीतील नळांना रविवारी सकाळी चक्क गढूळ व शेवाळमिश्रित पिण्याचे पाणी आल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ग्रा. पं. अध्यक्ष व इतर सदस्यांनी या पाण्याच्या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी नळांना सोडल्यास देण्याची मागणी करण्यात येत आहे. नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळण्यासाठी शासनाकडून तीन विहिरींची खोदाई करण्यात आली आहे. प्रथम मरगाईनगरमध्ये नंतर मार्कंडेय नदी किनारी, थोड्या अंतरावर मागील वर्षी विहीर खोदाई करण्यात आली आहे.
विहिरीचे पाणी फिल्टर करून सोडण्याची मागणी
सध्या गावाला मार्कंडेय नदी किनारी असलेल्या विहिरीचे पाणी नळांना सोडण्यात येत आहे. मार्कंडेय नदीला केएलई हॉस्पिटल, वैभवनगर व शाहूनगर या उपनगरांचे व हॉस्पिटलचे सांडपाणी नाल्याद्वारे पाणी 12 महिने मार्कंडेय नदीला जाऊन मिळत असते. कंग्राळी बुद्रुक ग्रामपंचायतीने गावासाठी खोदाई केलेली विहीर मार्कंडेय नदीकाठावरच आहे. यामुळे वरील उपनगरांचे सांडपाणी मार्कंडेय नदीच्या पात्रामधून जाते. विहिरीमध्ये सांडपाणी झिरपले तर नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. यासाठी ग्रा. पं. ने सदर पाणी विहिरीवरच फिल्टर मशीन बसवून नंतर ते पाईप लाईनद्वारे गावातील नळांना सुरू करून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी करण्यात येत आहे.









