थेंबा-थेंबाचा द्यावा लागणार हिशेब
टय़ुनीशियाने पुढील 6 महिन्यांसाठी पेयजलावर कोटा सिस्टीम लागू केली आहे. म्हणजेच पिण्यासाठी मोजून-मापून पाणी मिळणार आहे. एवढेच नव्हे तर शेतीसाठी पाण्याच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. हा कठोर नियम 30 सप्टेंबरपर्यंत लागू राहणार आहे.
आमचा देश मागील अनेक महिन्यांपासून भीषण दुष्काळाला सामोरा जात आहे. आमच्या धरणामंध्ये पाणी साठवणूक क्षमता 100 कोटी क्यूबिक मीटर आहे, परंतु सध्या केवळ 30 टक्केच पाण्याचा साठा आहे. मागील वर्षाच्या सप्टेंबरपासून मार्चपर्यंत टय़ुनिशियात पावसाने दडी मारली असल्याचे कृषी विभागाचे अदाकारी हमादी हबीब यांनी सांगितले आहे.

स्थिती पाहता कृषी मंत्रालयाने पुढील 6 महिन्यांपर्यंत पेयजलाचे रेशनिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. या कालावधीत कुणालाच वाहन धुण्यासाठी पाण्याचा वापर करता येणार नाही. तसेच झाडांना पाणी देता येणार नाही. तसेच सार्वजनिक ठिकाणी सफाईसाठी पाण्याचा वापर करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. एखाद्याचे नियमाचा भंग केल्यास त्याला तुरुंगात जावे लागणार आहे.
टय़ुनिशियाच्या जल कायद्याच्या अंतर्गत नियमाचा भंग करणाऱयाला 6 दिवसांपासून 6 महिन्यांपर्यंतचा तुरुंगवास होऊ शकतो. सरकार मागील दोन आठवडय़ांपासून रात्रीच्या वेळी पाणीपुरवठय़ात कपात करत आहे. राजधानी आणि अनेक अन्य शहरांमध्ये पाण्याचे रेशनिंग सुरू झाल्याने पूर्ण देशात संताप फैलावत आहे.
महागाईत वाढ
सरकारच्या या निर्णयामुळे पूर्ण देशात सामाजिकदृष्टय़ा तणाव फैलावत अताहे. सर्वात वाईट अवस्था गरीबांची असून पाण्यासंबंधी घेण्यात आलेल्या निर्णयांमुळे महागाई वेगाने वाढत आहे. देशातील सिदी सलेम धरणात आता केवळ 16 टक्के पाणीसाठा आहे. पाण्याच्या टंचाईमुळे टय़ुनिशियातील पीक उत्पादन मोठय़ा प्रमाणात कमी झाले आहे.









