वादग्रस्त अल्जेरियन बॉक्सर इमाने खलीफचा गोल्डन पंच : फायनलमध्ये विश्वविजेत्या खेळाडूला केले पराभूत
वृत्तसंस्था/ पॅरिस
अल्जेरियन बॉक्सर इमाने खलीफने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे. 25 वर्षीय इमाने खलीफने महिलांच्या 66 किलो गटात चीनच्या विश्वविजेत्या यांग लिऊचा पराभव करून ही कामगिरी केली. खलीफचा विजय हा एक ऐतिहासिक क्षण ठरला. कारण ती बॉक्सिंगमध्ये ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणारी आफ्रिका आणि अरब जगतातील पहिली महिला ठरली. विशेष म्हणजे, मागील काही दिवसापासून इमाने खलिफ लिंग विवादामुळे खूप चर्चेत होती. तिच्यावर बायोलॉजिकल पुरुष असल्याचा आरोपही करण्यात आला होता. पण हे सारे वादविवाद मागे टाकत तिने सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे.
स्पर्धेच्या सुरुवातीला इमान खलिफाने राउंड ऑफ 16 फेरीचा सामना इटालियन बॉक्सर अँजेला कारिनीविरुद्ध खेळला. पण काही सेकंदातच या सामन्यातून इटालियन बॉक्सरने माघार घेतली होती. यानंतर खलिफाने अंतिम फेरीपर्यंत तिचे सर्व सामने एकतर्फी जिंकले. उपांत्यपूर्व फेरीत तिचा सामना हंगेरीच्या लुका हमारीशी झाला. या सामन्यात तिने 5-0 असा विजय मिळवत उपांत्य फेरीत धडक मारली.
अंतिम फेरीतही खलिफाचे वर्चस्व
उपांत्य फेरीत नेत्रदीपक विजयाची नोंद करणाऱ्या खलिफाने अंतिम फेरीतही एकतर्फी विजय मिळवला. अंतिम सामन्यात तिने चीनच्या माजी विश्वविजेत्या यांग लिऊविरुद्ध चमकदार कामगिरी केली. रिंगच्या मधूनच तिने अनेक दमदार पंच केले. या सामन्यात खलिफाने 5-0 असा एकतर्फी विजय मिळवला व सुवर्णपदकाला गवसणी घातली. दरम्यान, खलीफाच्या विजयानंतर संघाच्या एका सदस्याने तिला आपल्या खांद्यावर उचलले आणि अल्जेरियन प्रेक्षकांनी 15,000 क्षमतेच्या कोर्ट फिलिप स्टेडियममध्ये एकच जल्लोष केला.
खलिफावरुन वादंग, अनेक देशांनी केली तक्रार
यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये इमाने खलीफ महिला खेळाडू आहे की पुरुष? यावर मोठा वाद निर्माण झाला आहे. गत वर्षी नवी दिल्लीत झालेल्या महिलांच्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये इमाने ही टेस्टोस्टेरॉन आणि जेंडर एलिजिबीलिटी टेस्ट मध्ये अपात्र ठरली होती. त्यामुळेच तिला स्पर्धेतून बाद ठरवण्यात आले होते. असे असूनही ऑलिम्पिकमध्ये तिला सहभागी होण्याची परवानगी का देण्यात आली? अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे. अशातच इमान खलीफने तिच्या पहिल्याच सामन्यात इटलीच्या अँजेला कारिनीचा पराभव केल्याने पुन्हा वाद सुरू झाला. खलीफविरुद्धच्या सामन्यात कॅरिनीने 46 सेकंदानंतर सामना सोडण्याचा निर्णय घेतला. वादाच्या पार्श्वभूमीवर अल्जेरियन खलिफासाठी ही स्पर्धा मुळीच सोपी नव्हती. संपूर्ण स्पर्धेदरम्यान जगभरासह सोशल मीडियावर तिला ट्रोल केले गेले. पण ती हरली नाही. अखेरपर्यंत लढत तिने सुवर्ण जिंकण्याची किमया केली.









