भारतीय संस्कृतीच्या कपड्यांमध्येच प्रवेश : पाश्चात्य पोशाखांवर बंदी
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
गुजरातच्या जगप्रसिद्ध श्री द्वारकाधीश मंदिराने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भगवान द्वारकाधीशच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी भारतीय संस्कृतीनुसार वेशभूषा करून मंदिरात यावे, असे आवाहन मंदिर प्रशासनाने केले आहे. मंदिराची प्रतिष्ठा कायम राहण्यासाठी हे आवश्यक असल्याचे मंदिर प्रशासनाने म्हटले आहे. द्वारका येथील जगत मंदिरात देश-विदेशातील लाखो भाविक दर्शनासाठी पोहोचतात. अशा परिस्थितीत भाविकांनी तोकडे कपडे घालून येऊ नका, असे आवाहन मंदिर प्रशासनाने केले आहे.
मंदिर प्रशासनाने ड्रेस कोड संबंधीच्या सूचनांचा फलक मंदिर परिसरात लावला आहे. यामध्ये गुजराती, हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये डेस कोडची माहिती देण्यात आली असून मंदिरात प्रवेश करण्यासाठीचे कपडे भारतीय संस्कृतीनुसार असावेत, असे लिहिले आहे. आवारात फलक लावण्याबरोबरच मंदिर प्रशासनाने द्वारकेतील हॉटेल्स आणि सर्व गेस्ट हाऊसनाही यासंबंधीची माहिती भाविकांना देण्याचे निर्देश दिले आहेत. गुजरातमधील द्वारकाधीश मंदिर हे प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. मंदिर समितीच्या म्हणण्यानुसार लहान कपडे घालून येणाऱ्या लोकांना प्रवेश मिळणार नाही. श्री द्वारकाधीश मंदिर समितीनुसार पुरुष भाविक शर्ट, ट्राउजर, धोतर आणि पायजमा घालून मंदिरात येऊ शकतात. तर महिलांसाठी साडीव्यतिरिक्त चुडीदार-पायजमा डेस कोडमध्ये समाविष्ट आहे. मात्र, शॉर्ट्स, मिनी स्कर्ट, मिडीज, स्लीव्हलेस टॉप, कमी आकाराच्या जीन्स-पँट, टी-शर्ट यावर बंदी आहे









