-ड्रीमवर्ल्ड वॉटर पार्क राजकीय अनास्थेचा बळी
-महापालिकेची डोकेदुखी वाढली
संतोष पाटील,कोल्हापूर
Kolhapur : राजकीय अंगाने आरोप होऊ लागल्याने अजून नऊ वर्षे करार वाढवण्याची संधी असूनही वापरकर्त्यांनी रमणमळ्यातील ड्रीमवर्ल्ड वॉटरपार्कचा हक्क सोडला.करणायांनी राजकारण केले,मात्र,आता ही जागा वापराविना ओसाड बनू पाहत आहे. या शेजारी पोलीस अधीक्षकासह उपजिल्हाधिकाऱयांची निवासस्थानं आणि उच्चभ्रूवस्तू असूनही येथे आता गांजा ओढणाऱ्यांसह आणि तळीरामांचा अड्डा बनला आहे.मागचा पुढचा विचार न करता राजकारणातून केलेल्या कृतीने महापालिकेचे तर कोटय़वधीचे नुकसान झालेच आहे, आता या मोक्याच्या जागेवर अतिक्रमणासह अवैध वापर होऊ लागला आहे. पर्यटकांना आकर्षीत करण्यांसह महापालिकेला महसूल देणारा उपक्रम निव्वळ राजकीय इर्षेतून बंद तर पडलाच पण दुसऱया बाजूला ही बकाल झालेली जागा महापालिकेसह आजूबाजूच्या रहिवाशांची डोकेदुखी वाढवणारी आहे.
कसबा बावडा रस्त्यावर रमणमळा येथील पूर्वाश्रमीचं साहेबांच तळ्याच रुपांतर मागील वीस वर्षात वॉटरपार्कमध्ये झाले.कसबा बावडासह परिसरातील नागरिकांसाठी हे तळे म्हणजे अनेक भीतीदायक अख्यायिका होती.येथे भुतआत्मांचा वावर असल्याची भीती जुन्याजाणत्याकडून कानावर पडत होती.त्यामुळे या परिसरातून रात्रीच्या वेळी जाणाऱया लोकांसाठी हे तळे ओलांडणे म्हणजे अनेक हृदयाचा ठोका चुकवणारे असेच होते.सुमारे 25 वर्षापूर्वी ज्या तळ्याकडे रात्रीचं सोडाच पण दिवसाही जाण्याचे धाडस होत नव्हते.तिथे खासगीकरणातून शहराच्या वैभवात भर टाकणारे वॉटरपार्क आकाराला आले.2002 साली ज्ञानशांती ऍन्ड कंपनीने ही जागा 29 वर्षे कराराने घेतली. अथक प्रयत्नांने तळ्याचे रुपांतर वॉटरपार्कमध्ये झाले.मागील 20 वर्षात कंपनीने महापालिकेला एक कोटी 75 लाख रुपये भरले.परजिह्यातून येणाऱया विद्यार्थ्यांच्या सहलींसह रोज शेकडो पर्यटक वॉटरपार्कला भेट देत होते.रोजसुमारे 150 लोकांचा कायमचा रोजगार मिळाला. वॉटरपार्कमुळे आजूबाजूची जागेचं मोल वाढून पॉश रहिवाशी परिसर वसला.
दरम्यान,वॉटरपार्क जागेचा घरफाळ्याचा मुद्दा उपस्थित झाला.यावरुन राजकारण तापले.याकाळात निवडणुका आल्या आणि प्रचारात वॉटरपार्कचा मुद्दा नाही असे झाले नाही.निविदा प्रक्रियेत या जागेसंबंधी सर्वकर संबंधित कंपनीने भरण्याची अट होती.मात्र,निवीदेप्रक्रियेनंतर कंपनीसोबत केलेल्या करारामध्ये तसा कोणताही उल्लेख नव्हता.महापालिकेनेही या 18 वर्षांच्या काळात आरोप होण्यापूर्वी मिळकत कराबाबत कंपनीला नोटीस अथावा सुचना केली नव्हती.मात्र,येथील घरफाळा बुडवल्याचा आरोप झाल्यानंतर दीड लाख मिळकत कर कंपनीने भरल्याचा दावा केला.आरोपानंतर कर कसा भरला?यावरुन राजकीय वादंग उठवले.त्यानंतर कंपनीने अजून नऊ वर्षे अवधी असतानाही वॉटरपार्कची जागा सोडण्याचा निर्णय घेतला.मागील काही दिवसांपासून कंपनीने सभोवताल मारलेले पत्रे,आतील वस्तू काढून घेतल्या.मागील 20 वर्षापासून बंदिस्त असलेली ही जागा आता एकदमच रिकामी झाली.कोणालाही सहज या परिसरात जाण्याचा मार्ग मोकळा झाला.
या रिकाम्या जागेत तळीरामांचा वावर वाढला आहे.गांजा ओढणाऱया टोळक्यांनी अड्डा बनवला आहे.एक व्यावसायिक बाजू असली तरी या परिसराने मागील 20 वर्षात वैभव गाठले होते.आता हीच जागा ओसाड बनू पाहत आहेत.या जागेतील अवैधबाबींचा वावर परिसरातील रहिवाशांचे सामाजिक स्वास्थ बिघडवणारी आहे. या जागेबाबत राजकीय,प्रशासकीय आणि व्यावसायिक बाजू काहीही असली तरी महापालिकेला उत्पन्न देण्यासह पर्यटन वाढीस चालना देणारा असा परिसर पुन्हा होण्याची गरज आहे.राजकीय स्पर्धेतून शहराचा परिसराचा विकास झाल्याची परजिह्यातील शेकडो उदाहरणं आहेत.कोल्हापूर याबाबतीत मात्र कमनशीबी म्हणावे लागेल.व्यावसायिक गणित झाली,राजकारण झालं आता या परिसरातील सामाजिक स्वास्थ बिघडू नये,यासाठीही राजकीय आणि प्रशासक पातळीवर प्रयत्न व्हावेत,अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
असा होऊ शकतो जागेचा वापर
या जागेवर आणि तळ्याच्या सभोवताली 150 हून अधिक डेरेदार वृक्ष आहेत. नैसर्गिकरित्या तळ्यात चांगला जलसाठा आहे. कंपनीने मागील 20 वर्षात खूप चांगल्या प्रकारे लॅन्डस्केपिग केले आहे. येथील पाण्याचा आणि सुशोभिकरणाचा वापर करुन शहर सौंदर्यात भर घालणारे सुंदर उद्यान होऊ शकते. महापालिकेची आर्थिक स्थिती कमकुवत असल्याने राज्य शासनाने सभोवताली सुरक्षा कठडय़ासह बगीच्यासाठी आर्थिक तरतूद करण्याची गरज आहे.
आरक्षित जागांचा लेखाजोखा
-दवाखाना- 21 पैकी पाच जागांचा वापर 16 जागा पडून
-मार्केट – 30 पैकी फक्त 13 जागांचा विकास
-वाचनालयासाठी आरक्षित 14 पैकी फक्त जागांवर वाचनालये.
-खुल्या जागा, बगीचे व मैदाने व आयलॅन्डसाठी आरक्षित 129 जागांपैकी फक्त 18 जागांचा विकास, या जागांचे क्षेत्रफळ 117 हेक्टर असून यापैकी फक्त 2.19 हेक्टरचाच वापर.
-माध्यमिक व प्राथमिक शाळांसाठी 41 पैकी 18 जागांचा वापर.म्युनिसिपल पर्पजसाठी 19hewkeÀer 13 जागांचा विकास.
शासकीय व निमशासकीय कारणांसाठी आरक्षित 20 पैकी 13 जागा पडून आहेत.
-इतर जागा ग्रीन पार्क, वेस्ट वॉटर मॅनेजमेन्ट, फ्लेईंग ग्रीन गार्डन, केएमटी वर्कशॉप आदींसाठी आरक्षित आहेत.
महापालिकेकडील विविध कारणांसाठी आरक्षित सुमारे 350 जागा वापराविना पडून आहेत. या जागेवर सुरक्षा कठडे लांबच अनेक जागा महापालिकेने नावावरही केलेल्या नाहीत. या यादीत आता वॉटरपार्कच्या जागेचा समावेश होईल. ही जागा पुन्हा सत्कारणी लागण्यासाठी सर्वंकष प्रयत्नांची गरज आहे.









