दक्षिण मतदारसंघातील लाभार्थी वसती योजनेपासून वंचित : विधानसौध परिसरात आंदोलन
बेळगाव : शहराच्या दक्षिण मतदारसंघातील वाजपेयीनगर वसती योजनेंतर्गत (जी+2) मॉडेल घरांचे बांधकाम आणि इतर सुविधा तातडीने पुरवा, अशी संबंधित लाभार्थी कुटुंबीयांनी मंगळवारी विधानसौध परिसरात आंदोलन छेडून मागणी केली. वसती योजनेंतर्गत घरकुलाचे स्वप्न पाहणाऱ्या गोरगरीब 300 कुटुंबीयांनी महापालिकेला अर्जासोबत काही रक्कम देऊ केली आहे. मात्र, अद्याप या कुटुंबीयांना कोणत्याही प्रकारची निवास व्यवस्था मंजूर झालेली नाही. याबाबत मनपाचे अधिकारी वसती योजनेतून घर मिळवून देण्याचे आश्वासन देत आहेत. मात्र, संबंधित लाभार्थ्यांकडे घर नसल्याने निवाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तब्बल 12 वर्षांपासून वसती योजनेतील घराचे स्वप्न अधुरे राहिले आहे.
मनपाकडून वसती योजनेंतर्गत घरकुल बांधून देण्याचे सांगण्यात आले होते. दरम्यान, 2022 मध्ये पायाभरणीदेखील झाली. मात्र, अद्याप बांधकामाला प्रारंभ झाला नाही. दरम्यान, 18 महिन्यांत निवासी घरे बांधून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र दोन वर्षांचा कालावधी उलटला तरी अद्याप लाभार्थी घरापासून वंचित राहिले आहेत. त्याबरोबर प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत जी+3 अंतर्गत घरांसाठी रक्कम मनपाकडे सुपूर्द करण्यात आली आहे. मात्र अद्याप घर बांधणीच्या कामाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे वसती योजनेतील लाभार्थ्यांच्या घरांची कामे तातडीने मार्गी लावावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.









