‘आयपीएल’नं जसं अनेक खेळाडूंच्या घसरत्या कारकिर्दीला सावरलंय तसंच अनपेक्षितपणे अनेक नव्या चेहऱ्यांना प्रकाशझोतात आणण्याचं, त्यांच्या जीवनाला विलक्षण कलाटणी देण्याचं काम इमाने इतबारे केलंय…या यादीत आता ताजं नाव झळकलंय ते मुंबई इंडियन्सचा डावखुरा गोलंदाज अश्वनी कुमारचं…
‘इंडियन प्रीमियर लीग’ची सर्वांत मोठी वैशिष्ट्यापूर्ण बाब म्हणजे नवोदितांना रंगमंचावर येण्याची मिळणारी संधी…‘त्याचं’ही तसंच झालंय…जेव्हा ‘त्यानं’ मुंबई इंडियन्सच्या वतीनं कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध ‘आयपीएल’ पदार्पण केलं तेव्हा ‘तो’ प्रचंड भांबावलेला होता…विशेष म्हणजे त्यानं फक्त एक केळं तेवढं खाल्लं. परंतु काही तासांनंतर त्या 23 वर्षीय डावखुऱ्या जलदगती गोलंदाजानं वानखेडे स्टेडियम अक्षरश: दणाणून सोडला…त्यानं नोंद केली ती ‘इंडियन प्रीमियर लीग’मध्ये एखाद्या भारतीय गोलंदाजानं पहिल्यावहिल्या सामन्यात केलेल्या सर्वोत्तम कामगिरीची…तीन षटकांच्या स्पेलमध्ये 24 धावा व 4 बळी…
‘आयपीएल’मधील पहिल्याच चेंडूवर अजिंक्य रहाणेला उडविलं आणि त्यानंतर रिंकू सिंग, मनीष पांडे अन् आंद्रे रसेल यांनाही परतीची वाट दाखविली…‘त्याच्या’ पराक्रमामुळं वानखेडेवर हजर असलेले 30 हजार प्रेक्षक बेभान झाले नि मुंबईनं आठ गडी राखून सामना खिशात घालताना दोन पराभवांनंतर पहिला विजय साजरा केला…नाव : अश्वनी कुमार…‘केकेआर’विरुद्धच्या त्या लढतीपूर्वी अश्व़नी खेळला होता तो अवघ्या चार टी-20 सामन्यांत, पंजाबतर्फे दोन रणजी लढतींत नि चार ‘अ’ श्रेणीच्या सामन्यांत…
त्या लढतीनंतर अश्वनी म्हणाला, ‘हार्दिक पंड्यानं सल्ला दिला तो प्रतिस्पर्ध्यांच्या देहाला रोखून मारा करण्याचा, आखूड टप्प्याच्या गोलंदाजीवर भर देण्याचा. माझ्या चंदिगडजवळच्या झांजेरी गावातील बहुतेक सर्वांनी सामना पाहिलेला असेलच. कारण त्यांना प्रतीक्षा होती ती या क्षणाची. देवाच्या कृपेमुळं सर्व काही व्यवस्थित घडलंय’…अश्वनी कुमारच्या भात्यात घातक आखूड टप्प्याचा चेंडू असून वेगात बदल करणं हे आणखी एक वैशिष्ट्या. खेरीज ‘वाईड यॉर्कर्स’चा सुद्धा तो चांगल्या पद्धतीनं वापर करतोय…
मुंबई इंडियन्सच्या गुणवत्तेचा शोध घेणाऱ्या चमूनं स्थानिक ‘शेर-ए-पंजाब टी-20 चषक’ सामन्यांतील त्याची कामगिरी गेल्या वर्षी पाहिल्यानंतरच अश्वनीची निवड करण्याचा निर्णय घेतला होता. कारण त्यावेळी अतिशय रंगतदार सामने त्यानं संघाला केवळ स्वत:च्या बळावर जिंकून दिले होते…अश्वनीला पंजाब संघात सहज प्रवेश मिळविणं शक्य झालं नाही ते सतत होणाऱ्या दुखापती आणि वेगवान गोलंदाजांमधील जबरदस्त स्पर्धा यामुळं. असं असलं, तरी एका सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या या तरुणानं कष्टांच्या जोरावर वानखेडेवरील जलदगती गोलंदाजांना मदत करणाऱ्या खेळपट्टीवर प्रताप गाजविण्यापर्यंत छान मजल मारलीय…
उत्साह ओतून वाहू लागलेल्या प्रेक्षकांना जसप्रीत बुमराहची गैरहजेरी सुद्धा त्या सामन्यात जाणवली नाही व अपेक्षेप्रमाणं सर्वोत्तम खेळाडूचं इनाम अश्वनीलाच मिळालं. ‘त्याच्या गोलंदाजीवर अनेक प्रशिक्षकांचं लक्ष होतं ते अगदी सुरुवातीपासून. कोलकाताविरुद्धच्या अश्वनीच्या त्या स्पेलचं वर्णन अफलातून असंच करावं लागेल. त्याला अखेर संधी मिळालीय ती कित्येक दिवस प्रतीक्षा केल्यानंतर आणि त्यानं त्याचं सोनं केलंय. पंजाबचं प्रतिनिधीत्व करताना पहिल्या रणजी लढतीत देखील अश्वनी कुमारनं अप्रतिम गोलंदाजीचं दर्शन घडविलं होतं अन् खरं म्हणजे त्याला जास्त सामने खेळायला मिळण्याची गरज होती. पण दुखापतींमुळं बाहेर बसावं लागलं. तरी देखील त्यानं सकारात्मकतेला ‘गूड बाय’ म्हटलं नाही नि तो वाट पाहत बसला’, चंदिगडमधील एका प्रशिक्षकाचे शब्द…
आता अश्वनीच्या गुणवत्तेचं दर्शन सर्वांनाच घडलंय. चेन्नई सुपर किंग्स व मुंबई इंडियन्स यांनी नवीन युवा प्रतिभा शोधण्यावर भर दिलाय, त्यांना आत्मविश्वास दिलाय, संधी दिलीय. या वातावरणामुळं अनेक खेळाडूंना वाढण्यास मोलाची मदत झालीय अन् त्यांनी भारतीय संघापर्यंत झेप घेतलीय…अश्वनी कुमारच्या वेगवान गोलंदाजीतील विविधता पाहिल्यानंतर समालोचकांमध्ये सुद्धा बरीच चर्चा रंगल्याशिवाय राहिली नाही…‘आयपीएलची सुरुवात करतानाच अजिंक्य रहाणेसारख्या फलंदाजाचा बळी खात्यात जमा करणं म्हणजे मस्करी नव्हे. 20 ते 30 हजार प्रेक्षकांसमोर पहिली लढत खेळणारा खेळाडू नेहमीच दबावाखाली वावरत असतो हे लक्षात घ्यायला हवं. परंतु जर लवकर बळी मिळाला, तर सारी परिस्थिती बदलते आणि गोलंदाजाचा आत्मविश्वास बळावतो. त्यानं मिळविलेले अन्य बळी हा त्याचाच दाखला’, त्या चर्चेचा सूर…
अश्वनीच्या गोलंदाजीत वरिष्ठ पातळीवर चमकण्याचं कौशल्य असून आता त्यानं भर द्यायला हवा तो त्या माऱ्याला अधिक धारदार बनविण्यावर. प्रशिक्षक सांगतात की, तो लहानपणापासून शिबिरांत गोलंदाजी करण्यास नेहमीच उत्सुक असायचा अन् न थकता चेंडू टाकायचा…सध्या अश्वनी कुमर ताशी 140 किलोमीटर्सच्या वेगानं मारा करतोय. गरज आहे ती या डावखुऱ्या गोलंदाजानं गतीनं चेंडू ऑफ स्टम्पच्या बाहेरून आत आणण्याचं कौशल्य अधिक प्रभावी बनविण्याची. बाकी त्याच्या मुठीत फलंदाजाची भंबेरी उडविणारा बाउन्सर, चांगला यॉर्कर आणि फसविणारे कमी गतीचे चेंडू असल्याचं सर्वांनी पाहिलंय…
अश्वनीचा अन्य एक महत्त्वाचा गुण म्हणजे चुरशीच्या सामन्यांच्या दबावाला चांगल्या पद्धतीनं तोंड देणं. स्थानिक ‘शेर-ए-पंजाब टी-20 चषक’ स्पर्धेतील लढतींत तो शेवटच्या षटकांत आवश्यक असलेल्या सात-आठ धावा देखील काढण्याची प्रतिस्पर्ध्यांना संधी देत नसे…तज्ञांच्या मते, येऊ घातलेल्या दिवसांत अश्वनी कुमारनं भर द्यायला हवा तो रणजी स्पर्धेसारख्या सामन्यांत सातत्यपूर्ण कामगिरी करण्यावर. कारण कित्येक खेळाडू दोन महिन्यांची ‘इंडियन प्रीमियर लीग’ संपल्यानंतर अचानक गायब होतात. त्यानं काळजी घ्यायला हवी ती आपल्या बाबतीत तसं घडणार नाही याची. त्याच्यामध्ये चांगली फलंदाजी करण्याची सुद्धा क्षमता असल्यानं अश्वनी कुमारला अष्टपैलू खेळाडू बनणंही कठीण नाहीये…
अश्वनी कुमारनं अनेक बाबी शिकायला हव्यात त्या सध्या वेगानं पुढं जाणाऱ्या अर्शदीप सिंगकडून. अर्शदीप देखील पंजाबचंच प्रतिनिधीत्व करतोय…मुंबई इंडियन्सच्या प्रशिक्षकांच्या जबरदस्त फळीत समावेश आहे तो मुख्य प्रशिक्षक माहेला जयवर्धने, लसिथ मलिंगा व भारताचे माजी गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांब्रे यांचा. शिवाय तिथं जसप्रीत बुमराह व ट्रेंट बोल्ट यांचा सहवासही त्याला लाभेल. या पार्श्वभूमीवर तो पुढं बरीच मजल मारेल अशी अपेक्षा बाळगणं चुकीचं ठरणार नाहीये !
सलामीच्या लढतीत प्रताप गाजविणारे गोलंदाज…
- ‘आयपीएल’मध्ये सहा गोलंदाजांनी आपला पहिलवहिला सामना खेळताना चार वा अधिक बळी मिळविण्याचा पराक्रम केलाय. त्यात अश्वनी कुमार हा पहिला भारतीय गोलंदाज…
- अन्य गोलंदाजांमध्ये समावेश आहे तो अल्झारी जोसेफ (मुंबई इंडियन्स-12 धावांत 6 बळी), अँड्य्रू टाय (गुजरात लायन्स-17 धावांत 5 बळी), शोएब अख्तर (कोलकाता नाईट रायडर्स-11 धावांत 4 बळी), केव्हन कूपर (राजस्थान रॉयल्स-26 धावांत 4 बळी) अन् डेव्हिड विज (आरसीबी-33 धावांत 4 बळी) यांचा…
प्रचंड कष्टांना मिळालेलं फळ…
- नाणेफेकीच्या वेळी समालोचक रवी शास्त्राrनं मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याला त्याच्या संघाच्या रचनेविषयी विचारलं असता पंड्याला क्षणभर अश्वनीचं नावच आठवेनासं झालं होतं, पण तो सामना संपला तेव्हा सर्वांच्या आठवणीत राहिलं तो तोच खेळाडू…
- या कामगिरीनं त्याचे वडील हरकेश, अन्य कुटुंबीय व मित्रांना आठवण झाली ती त्यानं क्रिकेटच्या प्रेमापायी युवादशेत मोठ्या प्रमाणात काढलेल्या कष्टांची…त्यावेळी तो आपल्या झांजेरी गावातून 11 किलोमीटर दूर असलेला आय. एस. बिंद्रा पीसीए स्टेडियम सायकलनं किंवा कधी लिफ्ट मिळवून, तर कधी ‘शेअर ऑटो’च्या माध्यमातून गाठायचा…प्रशिक्षण संपवून परत येईपर्यंत रात्रीचे 10 वाजायचे. मग दुसऱ्या दिवशी पुन्हा पहाटे 5 वा. उठून रवाना होणं…
- त्यावेळी प्रवासाच्या भाड्यापोटी अश्वनी वडिलांकडे मागायचा 30 रुपये अन् महालिलावात मुंबई इंडियन्स त्याला करारबद्ध केलं ते तब्बल 30 लाख रुपयांना…
- सुऊवातीच्या काळात पीसीए अकादमीमध्ये अभिषेक शर्मा, रमणदीप सिंग आणि अर्शदीप सिंग यांच्यासोबत वावरलेल्या अश्वनीनं पंजाबकडून रणजीमध्ये पदार्पण केलं ते 2019 मध्ये…त्या अकादमीमध्ये त्यानं प्रशिक्षक दिनेश, सुमित ओहरी अन् माजी भारतीय आंतरराष्ट्रीय वेगवान गोलंदाज व्ही. आर. व्ही. सिंग यांच्याकडून धडे घेतले…व्हीआरव्ही यांनी त्याच्यातील वेगवान गोलंदाजीचं कौशल्य ओळखलं अन् त्याला वेगवान गोलंदाजीचे तांत्रिक पैलू समजण्यास मदत केली…
- अश्वनी कुमारनं यापूर्वी चेन्नई सुपर किंग्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्सच्या चाचणीमध्येही भाग घेतला होता…या 23 वर्षीय वेगवान गोलंदाजानं मागील मोसम घालविला तो पंजाब किंग्सच्या तंबूत. परंतु तिथं त्याला कधीही संघात स्थान मिळालं नाही…
‘आयपीएल’मध्ये पहिल्याच चेंडूवर बळी घेणारे गोलंदाज…
गोलंदाज (संघ) प्रतिस्पर्धी संघ (साल) बाद केलेला फलंदाज
- अश्वनी कुमार (मुंबई इंडियन्स) कोलकता नाईट रायडर्स (2025) अजिंक्य रहाणे
- मथीशा पाथिराना (चेन्नई सुपर किंग्स) गुजरात टायटन्स (2022) शुभमन गिल
- अल्झारी जोसेफ (मुंबई इंडियन्स) सनरायझर्स हैदराबाद (2019) डेव्हिड वॉर्नर
- टी. पी. सुधींद्र (डेक्कन चार्जर्स) चेन्नई सुपर किंग्स (2012) फाफ डू प्लेसिस
- अली मूर्तझा (मुंबई इंडियन्स) राजस्थान रॉयल्स (2010) नमन ओझा
- चार्ल लाँगवेल्ट (कोलकाता नाईट रायडर्स) राजस्थान रॉयल्स (2009) रॉब क्विनी
- अमित सिंग (राजस्थान रॉयल्स) पंजाब किंग्स (2009) सनी सोहल
- शेन हारवूड (राजस्थान रॉयल्स) डेक्कन चार्जर्स (2009) अझर बिलाखिया
- विल्किन मोटा (किंग्स इलेव्हन पंजाब) चेन्नई सुपर किंग्स (2008) सुरेश रैना
- इशांत शर्मा (कोलकाता नाईट रायडर्स) रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर (2008) राहुल द्रविड
– राजू प्रभू









