ज्ञानप्रबोधन शाळेत एम. जी. हिरेमठ, श्रुती यरगट्टी यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन
प्रतिनिधी / बेळगाव
तरुण भारत ट्रस्ट संचालित ज्ञानप्रबोधन शाळेत गुरुवारी नववी व दहावी इयत्तेच्या विद्यार्थ्यांसाठी करियर मार्गदर्शन पार पडले. यावेळी निवृत्त प्रादेशिक आयुक्त एम. जी. हिरेमठ व नवनिर्वाचित आयएएस अधिकारी श्रुती यरगट्टी यांनी विद्यार्थ्यांना अनेक उदाहरणे देऊन प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
व्यासपीठावर निवृत्त प्रादेशिक आयुक्त एम. जी. हिरेमठ, श्रुती यरगट्टी, सचिव जगदीश कुंटे, संचालक गिरीधर रविशंकर, डॉ. डी. एन. मिसाळे, प्राचार्या मंजिरी रानडे, शिवानंद यरगट्टी आदी उपस्थित होते. प्रारंभी शाळेच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले. पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. यावेळी जगदीश कुंटे यांनी शाळेच्या प्रगतीचा आढावा घेतला.
यावेळी श्रुती यरगट्टी यांनी आपल्या जीवनाचा खडतर प्रवास विद्यार्थ्यांसमोर मांडला. यावेळी त्या म्हणाल्या कष्ट, मेहनत, सातत्य आणि निवनिर्मिती करण्याची ताकद निर्माण करून येणाऱ्या प्रत्येक संकटाला सामोरे गेले पाहिजेत. विद्यार्थ्यांना अनेक प्रेरणादायी उदाहरणे देऊन भविष्यात अनेक क्षेत्रात संधी उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
एम. जी. हिरेमठ म्हणाले, आजच्या स्पर्धेच्या युगात निर्णय क्षमता महत्त्वाची आहे. योग्यवेळेला योग्य स्वप्न बघा त्या स्वप्नाचा पाठलाग करा, जोपर्यंत ती पूर्ण होत नाहीत. तोपर्यंत प्रयत्न करा. जीवनात नेहमी योग्य निर्णय घ्या, स्वत:ची ताकद, कुवत आणि ज्ञान ओळखून स्वत:ला जोखून द्या, विज्ञान शाखेत भरपूर संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनादेखील या शाखेतून विविध क्षेत्रात भरारी घेता येते. मोठी स्वप्ने बघा ती पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घ्या, असा संदेशदेखील त्यांनी दिला.
लहानपणी ग्रामीण भागात शिक्षण झाले. त्यावेळी गावात तहसीलदार जीपमधून येत होते. त्या जीपकडे बघून आपणही एक दिवस मोठा अधिकारी होईन, असे स्वप्न उराशी बाळगले होते. त्यानुसार पहिल्यापासूनच ध्येयाच्या पाठीमागे पडून यश मिळविले, असे त्यांनी भावूक होऊन सांगितले. याप्रसंगी निवृत्त प्राचार्य डी. एन. मिसाळे यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. यावेळी प्रशासक डॉ. गोविंद वेलिंग, शिक्षक वर्ग, विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन हंसिका सैनानी आणि तनिष्का तेंडुलकर यांनी केले. तर प्राचार्या मंजिरी रानडे यांनी आभार मानले.
‘जलजीवन’चा अहवाल सादर करा
बेळगाव : घरोघरी नळपाणी योजनेसाठी जलजीवन मिशन योजना राबविण्यात आली आहे. काही ठिकाणी या योजनेतून कामे प्रलंबित आहेत. तर काही ठिकाणी कामे प्रगतिपथावर आहेत. जलजीवन मिशन योजनेचा अहवाल सादर करा, अशा सूचना जि. पं. सीईओ हर्षल भोयर यांनी अधिकाऱ्यांना केल्या आहेत.
या योजनेंतर्गत सुरू केलेल्या सर्व कामांच्या गुणवत्तेची तपासणी करावी, अशा सूचना बुधवारी झालेल्या बैठकीत ग्रामीण पेयजल आणि स्वच्छता विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या आहेत. पाऊस लांबणीवर पडल्याने जिल्ह्यात पाण्याची समस्या गंभीर बनली आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल होऊ लागले आहेत. ज्याठिकाणी पाणीटंचाई निर्माण झाली आहे, त्याठिकाणी टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा करा, त्याचबरोबर कूपनलिका आणि विहिरीत पाणी असल्यास त्याचा पिण्यासाठी वापर करावा. पिण्याच्या पाण्याविषयी योजना असल्यास त्या तातडीने पूर्ण करून ग्राम पंचायतीच्या स्वाधीन कराव्यात, या कामात गैरप्रकार आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारादेखील त्यांनी दिला आहे. यावेळी ग्रामीण पेयजल, स्वच्छता विभाग, साहाय्यक कार्यकारी अभियंते, योजना व्यवस्थापक उपस्थित होते.









