ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनने (डीआरडीओ) आज स्वदेशी बनावटीच्या स्क्रॅमजेट प्रॉपल्शन प्रणालीचा वापर करून हायपरसॉनिक टेक्नॉलॉजीची यशस्वी चाचणी घेतली. डीआरडीओचे प्रमुख सतीश रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली हायपरसॉनिक मिसाईल टीमने ही चाचणी केली.
हायपरसॉनिक टेस्ट डेमॉनस्ट्रेटर व्हेइकलची (HSTDV) ही चाचणी होती. आज सकाळी 11 वाजून 3 मिनिटांनी ओडीशामधील बालासोर येथील अब्दुल कलाम टेस्टिंग रेंजवर ही चाचणी घेण्यात आली. HSTDV चाचणी यशस्वी झाल्यामुळे DRDO पुढच्या पाचवर्षात स्क्रॅमजेट इंजिनसह हायपरसॉनिक क्षेपणास्त्र विकसित करु शकते. स्वदेशी टेक्नोलॉजीमुळे ते हवेत ध्वनीच्या वेगापेक्षा सहापट अधिक वेगाने झेपावेल. अमेरिका, रशिया आणि चीन नंतर हे तंत्रज्ञान विकसित करणारा भारत जगातील चौथा देश ठरला आहे.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी याबाबत एक ट्विट केले आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, ‘पंतप्रधान मोदींचे स्वावलंबी भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी या महान कामगिरीबद्दल मी डीआरडीओचे अभिनंदन करतो. भारताला डीआरडीओ आणि त्यांच्या शास्त्रज्ञांचा अभिमान आहे.’