टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी लक्ष्मण यांच्या नावाची जोरदार चर्चा :सेहवागही उत्सुक : करार वाढवण्यास द्रविड यांचा नकार
वृत्तसंस्था /मुंबई
आयसीसी वनडे विश्वचषक स्पर्धा संपल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळही संपला आहे. द्रविडकडे त्याचा कार्यकाळ वाढवण्याचा पर्याय असला तरी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, द्रविडला आता हा जास्त प्रवास करायचा नाही आणि काही वेळ कुटुंबासोबत घालवायचा आहे. याच कारणामुळे तो भारतीय संघासोबतचा कार्यकाळ वाढवू इच्छित नाही. यामुळे राहुल द्रविड यांच्यानंतर टीम इंडियाचा पुढील प्रशिक्षक कोण? हा प्रश्न सध्या चर्चेत आहे. टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी सध्या एनसीएचे (राष्ट्रीय क्रिकेट अकादमी) प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्यासह सेहवागचे नाव चर्चेत आहे. आगामी काळात टीम इंडियाचा प्रशिक्षक कोण होणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
भारतीय क्रिकेट संघासाठी राहुल द्रविडचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ अप्रतिम राहिला आहे. 2021 च्या टी 20 विश्वचषकानंतर तो संघात सामील झाला आणि पुढील दोन वर्षे संघात राहिला. त्यांच्या प्रशिक्षक पदाखाली भारतीय क्रिकेट संघ 2022 च्या टी 20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचला होता. याशिवाय आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतही धडक मारली होती जिथे त्यांना ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. याशिवाय, त्यांच्याच कालखंडात यंदाच्या वनडे वर्ल्डकपमध्ये देखील टीम इंडियाने शानदार कामगिरीचे प्रदर्शन साकारले. वनडे विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यासह द्रविडचा प्रशिक्षक कार्यकाळ संपला आणि आता त्याला जास्त प्रवास करायचा नाही, त्यामुळे भारतीय संघाचे प्रशिक्षकपद स्वीकारण्यात त्याला रस नाही.
पराभवाची उत्तरे दिली, विजयाचे क्रेडिट इतरांना दिले
राहुल द्रविडच्या कोचिंगची ही खासियत आहे. टीम इंडिया जेव्हा विजयी व्हायची तेव्हा तो बॅकसीटवर दिसायचा. पण जेव्हा संघाची कामगिरी खराब व्हायची, टीम इंडिया पराभूत व्हायची, तेव्हा तो समोर येऊन आपल्या खेळाडूंना बॅक करायचा आणि टीकाकारांना उत्तरे द्यायचा. संघाच्या पराभवानंतर राहुल द्रविड संपूर्ण जबाबदारी स्वत:वर घेताना दिसला. राहुल द्रविडच्या प्रशिक्षकपदाच्या कार्यकाळात भारताने टेस्ट
चॅम्पियनशीपची फायनल, 2022 च्या टी-20
वर्ल्डकपची सेमी फायनल आणि 2023 च्या वनडे वर्ल्डकपची फायनल खेळली. या सर्व सामन्यात भारताचा पराभव झाला. या सर्व पराभवानंतर द्रविड पत्रकारांच्या आणि टीकाकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना दिसला. त्याने आपल्या फलंदाजीसारखेच अगदी संयमाने सर्व प्रश्नांची उत्तरे दिली.
द्रविड यांच्यानंतर पुढे कोण?
राहुल द्रविड यांचा दोन वर्षाचा कालखंड संपल्यानंतर टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षक पदाची धुरा कोण सांभाळणार? असा प्रश्न सध्या चर्चेत आहे. अद्याप याबाबत कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एनसीए प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण यांचे नाव मुख्य प्रशिक्षकपदासाठी सध्या जोरदार चर्चेत आहे. लक्ष्मण गेल्या काही वर्षांपासून एनसीएचे प्रमुख आहेत आणि द्रविड यांच्या अनुपस्थितीत त्यांनी काही वेळा टीम इंडियाचे प्रशिक्षक म्हणून काम पाहिले आहे. याशिवाय, ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिकेसाठी सध्या ते टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक आहेत. तसेच लक्ष्मण यांच्याशिवाय माजी क्रिकेटपटू व स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागचे नाव रेसमध्ये आहे. यामुळे आगामी काळात टीम इंडियाचा प्रशिक्षण कोण होणार, याबातची उत्सुकता लागून राहिली आहे. दरम्यान, द्रविडसह त्याच्या सहाय्यक प्रशिक्षकाची भूमिका निभावणारे इतर प्रशिक्षक काय निर्णय घेतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड, गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांब्रे आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप यांच्याबाबत बीसीसीआयने कोणतीही निर्णय घेतलेला नाही.









