वृत्तसंस्था /राजकोट
भारतीय क्रिकेट संघाचे प्रमुख प्रशिक्षक राहुल द्रविड याच्याकडे ही जबाबदारी आयसीसीच्या आगामी टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेपर्यंत राहिल, अशी माहिती बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी दिली आहे. राहुल द्रविडचा बीसीसीआय बरोबरचा यापूर्वी केलेला प्रमुख प्रशिक्षकपदाचा करार गेल्यावर्षी भारतात झालेल्या आयसीसीच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेपर्यंत होता. त्यानंतर बीसीसीआयने डिसेंबर, जानेवारी दरम्यान दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यापर्यंत द्रविडकडे ही जबाबदारी कायम ठेवण्यास सांगितले होते. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी यासंदर्भात यापूर्वीच द्रविडशी चर्चा केली. आयसीसीची आगामी टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा येत्या जून महिन्यात विंडीज आणि अमेरिका यांच्या संयुक्त यजमानपदाने भूषविली जाणार आहे. या स्पर्धेपर्यंत भारतीय संघाच्या प्रमुख प्रशिक्षक पदाची जबाबदारी राहुल द्रविडवर राहिल, असे स्पष्टीकरण जय शहा यांनी दिले. सौराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या स्टेडियमवर बुधवारी रात्री एका समारंभाला उपस्थित राहण्यासाठी जय शहा यांचे येथे आगमन झाले होते.









