वृत्तसंस्था/ मुंबई
मुथय्या मुरलीधरनने त्याच्या महान फलंदाजांच्या यादीत राहुल द्रविडचाही समावेश पेलेला आहे, पण द्रविडला आपली गोलंदाजी ओळखण्याचा मार्ग सापडला नाही, असेही मत त्याने व्यक्त केलेले आहे. मंगळवारी येथे एका कार्यक्रमात बोलताना श्रीलंकेचा दिग्गज फिरकी गोलंदाज मुरलीधरन म्हणाला की, सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीरसह अनेक भारतीय फलंदाजांनी आपली गोलंदाजी नीट ओळखली. पण सध्याचा भारताचा मुख्य प्रशिक्षक द्रविडला ते जमले नाही.
सचिन तेंडुलकरने मी टाकलेले चेंडू चांगले ओळखले. बरेच खेळाडू ते करू शकले नाहीत. ब्रायन लाराला यश मिळाले खरे, पण त्यालाही माझ्याविरुद्ध कधी फटकेबाजी करता आली, असे मुरलीधरन त्याच्यावरील ‘800’ नावाच्या ‘बायोपिक’च्या ‘ट्रेलर लाँच’च्या वेळी म्हणाला. ‘मी काही खेळाडूंना ओळखतो, जसे की राहुल द्रविड, तो महान खेळाडूंपैकी एक आहे. पण त्याला माझी गोलंदाजी कधीच ओळखता आली नाही. सचिन, वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर चेंडू ओळखायचे. माझ्या संघातील देखील काही खेळाडू माझ्याकडून टाकले जाणारे चेंडू ओळखायचे, तर काहींना ते जमायचे नाही, असे मुरलीधरने यावेळी सांगितले.
यावेळी उपस्थित असलेला महान फलंदाज सचिन तेंडुलकरने या फिरकीच्या जादुगारासोबतच्या आपल्या पहिल्या भेटीच्या आठवणींना उजाळा दिला. 1992-93 मध्ये मुरलीधरनला पहिल्यांदा भेटल्याचे मला आठवते आणि आम्ही चांगले मित्र बनलो. त्याला फक्त गोलंदाजी करण्याची आवड होती आणि संपूर्ण जगाला कळून चुकले होते की, तो चेंडू भरपूर वळवू शकणारा फिरकीपटू आहे. त्याला ‘एक्स्प्रेस वे’वर गोलंदाजी करायला लावली, तरी तो चेंडू वळवेल. खेळपट्टी कशीही असो, त्याला फरक पडायचा नाही’, असे सचिन यावेळी म्हणाला.
मुरलीधरनने ‘दुसरा’ विकसित केला, पण जाळ्यात त्याचा सराव करण्यात त्याने बराच वेळ घालवला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशा प्रकारचा पहिला चेंडू टाकण्यापूर्वी 18 महिने तो जाळ्यात ‘दुसरा’ चा सराव करत राहिला. आपली मूळ ताकद आणि आपल्याकडे असलेले गुण त्याभरात गमावण्याचा प्रसंग येऊ नये हे dत्यामागील मुख्य कारण होते, असे तेंडुलकर पुढे म्हणाला.
मुरलीधरननेही सचिनचे कौतुक करताना म्हटले की, त्याने क्रिकेटमध्ये जे काही केले ते कोणीही करू शकत नाही. ही वस्तुस्थिती आहे. 15 व्या वर्षी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये प्रवेश करणे आणि 16-17 व्या वर्षी कसोटीत शतक करणे अशक्यप्रायच आहे. माझ्या जीवनकाळात तरी दुसरा सचिन तेंडुलकर जन्माला येणार नाही, असे मुरलीधरन पुढे म्हणाला.









