वृत्तसंस्था/ कोलकाता
भारतीय संघाचे प्रमुख प्रशिक्षक तसेच माजी कर्णधार राहुल द्रविड यांची प्रकृती नादुरुस्त झाल्याने त्यांनी तातडीने बेंगळूरला प्रयाण केले. सध्या भारत आणि लंका यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका सुरू असून गुरुवारी उभय संघातील दुसरा सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर खेळविला गेला होता. भारताने या सामन्यात विजय नोंदवून मालिका हस्तगत केली. द्रविडचे या संघाबरोबर कोलकातामध्ये वास्तव्य होते.
या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा वनडे सामना रविवारी थिरुवअनंतपुरम येथे होणार आहे. या सामन्यावेळी प्रमुख प्रशिक्षक राहुल द्रविड संघाबरोबर उपलब्ध होऊ शकणार नाही. आता त्याच्या गैरहजेरीत राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे संचालक व्ही. व्ही. एस. लक्ष्मण भारतीय संघामध्ये दाखल होणार आहेत. द्रविडला निश्चित कोणती समस्या जाणवली, हे मात्र समजू शकले नाही. गेल्या बुधवारी राहुल द्रविडने आपला 50 वा वाढदिवस साजरा केला होता. द्रविडने आपल्या वैयक्तिक क्रिकेट कारकीर्दीत 164 कसोटीत, 344 वनडे आणि एकमेव टी-20 सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले. त्याने वनडे क्रिकेटमध्ये दोनवेळा 300 पेक्षा अधिक धावांच्या भागीदारी नोंदविल्या आहेत. 2012 च्या मार्चमध्ये द्रविडने आंतरराष्ट्रीय क्रिकेट क्षेत्रातून निवृत्ती पत्करली होती. त्याने आपल्या क्रिकेट कारकीर्दीत 48 शतके नोंदविली असून 2021 च्या नोव्हेंबरमध्ये त्यांची भारतीय संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती.









