रविवारी बेळगावमध्ये रमेश कत्ती-ए. बी. पाटील यांची खास बैठक पार : आज महत्त्वपूर्ण निर्णय
संकेश्वर : गत दोन महिन्यात हुक्केरी तालुक्याचे राजकारण वेगवान घडामोडीने ढवळून निघाले होते. कत्ती परिवाराच्या राजकारणाला तिलांजली मिळणार अशी चिन्हे असतानाच रविवारी बेळगाव येथे झालेल्या कत्ती-पाटील यांच्या महत्त्वपूर्ण बैठकीत काही निर्णय झाल्याचे वृत्त पुढे आल्याने तालुक्याच्या राजकारणाला नाट्यामय वळण प्राप्त झाले आहे. संपूर्ण जिल्ह्यात या चर्चेला चांगलाच रंग आला असून या वळणाचा परिणाम होण्याची उत्कंठा शिगेला पोहचली आहे. हिरण्यकेशी सहकारी साखर कारखान्याच्या सर्व संचालकांसह कत्ती काका-पुतणे व माजी मंत्री ए. बी. पाटील यांची बेळगाव येथे रविवारी संयुक्त बैठक झाल्याची माहिती पुढे आली असून या बैठकीत तालुक्यातील सहकार क्षेत्रातील घडामोडी थोपवून लावण्यासह हिरण्यकेशी वीज संघाची निवडणूक मोठ्या शक्तीने लढवण्यावर या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते.
माजी मंत्री कै. उमेश कत्ती यांच्या निधनाने कत्ती यांच्या राजकीय भविष्यालाच आव्हान देणाऱ्या घटना एकापाठोपाठ घडल्या. परिणामी हुक्केरी तालुक्यातील हिरण्यकेशी व वीज संघातही सत्ता पालटली. यामुळे तालुक्यातील नेतृत्वाला शह देण्याच्या कारस्थानाने तालुक्याचे काय होणार? हा प्रश्न जनमाणसात उपस्थित झाला असतानाच माजी खासदार रमेश कत्ती व माजी मंत्री ए. बी. पाटील यांची दिलजमाई झाल्याने वेगवान घडामोडीचा अंत होण्यासह कत्ती-पाटील घराण्याच्या नवीन राजकीय समिकरणाचा अध्याय सुरू होणार, अशी चिन्हे स्पष्ट झाली आहेत. सोमवार दि. 28 रोजी माजी खासदार रमेश कत्ती हे आपल्या राजकीय भविष्यासह वीज संघाची निवडणूक व हिरण्यकेशीची भावी वाटचाल या विषयी महत्त्वपूर्ण घोषणा करणार असल्याची माहिती पुढे आली आहे.









