प्रतिनिधी/ बेळगाव
मराठी नाट्यासंगीत ही मराठी माणसांची ऊर्जा आहे. रात्र-रात्र चालणारी नाटके झापांच्या थिएटरमध्येही यदुकुळाचे वैभव उभारणारी, चित्रांकित पडदे, गॅसबत्त्यांच्या प्रकाशातही स्वर्गाचा आभास निर्माण करणारे दैवी स्वर यांनी नाट्यापरंपरा विकसित केली. गंधर्व युगामध्ये मराठी संगीत नाटकाने तर ऐश्वर्याचा कळस गाठला. विष्णुदास भावे यांनी 1843 मध्ये सीता स्वयंवर नाटक लिहिले. तेथून संगीत मराठी रंगभूमीचा जन्म झाला. तथापि, त्यांच्याही पूर्वी तंजावरच्या भोसले राजांनी अनेक नाटके लिहिली होती.
या मराठी संगीत नाटकांचा इतिहास उलगडत अभिजात नाट्यासंगीत हा कार्यक्रम शुक्रवारी संध्याकाळी मराठा मंदिर येथे झाला. अभिजात मराठी संस्थेतर्फे झालेल्या या कार्यक्रमामध्ये सुलक्षणा देसाई, योगेश रामदास व ऐश्वर्या निरंजन यांचा सहभाग होता. दिग्दर्शक व लेखक संध्या देशपांडे यांनी आपल्या निवेदनातून संगीत रंगभूमीचा सविस्तर आढावा घेतला. त्यांच्यासोबत प्रा. प्रणव पित्रे यांनीही निवेदन केले.
या कार्यक्रमाची सुरुवात नांदीने झाली. ‘सप्तसूर झंकारित बोले’ या नांदीनंतर सुलक्षणा यांनी ‘नाथ हा माझा मोही खला’ हे नाट्यागीत सादर केले. त्यानंतर योगेश रामदास यांनी प्रेम, वरदान, स्मरसदा तर ऐश्वर्या निरंजन यांनी ‘युवती मना दारुण रण’ हे नाट्यागीत सादर केले. त्यानंतर सुलक्षणा यांनी ‘अवघाची संसार’, ‘कशी केलीस माझी दैना’, योगेश रामदास यांनी ‘रतीहून सुंदर मदन मंजिरी’, ‘मर्म बंधातली ठेव ही’, ऐश्वर्या यांनी ‘हे सुरांनो चंद्र व्हा’ व ‘का धरिला परदेश’ ही नाट्यागीते सादर केली. ‘अगा वैकुंठीच्या राया’ या नाट्यागीताने सांगता झाली. त्यांना तबल्यावर अंगद देसाई, संवादिनी व ऑर्गनवर संतोष मिस्त्री, व्हायोलियनवर केदार गुळवणी यांनी साथ केली. सूत्रसंचालन भारती सावंत यांनी केले.









