प्रतिनिधी / कराड :
येथील वाढीव भागातील वाखाण रोडवर प्रीतिसंगम पाणी पुरवठा संस्थेशेजारी रस्त्यात असणारा ड्रेनेजचा चेंबर साफ करताना दुर्घटना घडली. पालिकेच्या डेनेज विभागाच्या कर्मचाऱ्याचा 30 फूट चेंबरमध्ये कोसळून गुदमरून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी दुपारी घडली. या कर्मचाऱ्यास वाचवण्यासाठी उतरलेला दुसरा कर्मचारी गुदमरून बेशुद्ध झाला होता. मात्र, त्याची प्रकृती सुधारत असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेने शहरात तीव्र हळहळ व्यक्त होत असून पालिका वर्तुळासह शहरावर दु:खाची छाया पसरली आहे.
अनिरूद्ध संजय लाड (वय 26, रा. पत्रा चाळ, सोमवार पेठ) असे मयत झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. तर अमोल किरण चंदनशिवे (वय 48, रा. कराड) हा कर्मचारी जखमी झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच मुख्याधिकारी रमाकांत डाके, ड्रेनेजचे अभियंता ए. आर. पवार यांच्यासह माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.
याबाबत नागरिकांकडून मिळालेल्या व मुख्याधिकारी डाके यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, वाखाण रस्त्यावरील ड्रेनेजचे चेंबर साफ करण्यासाठी ड्रेनेज विभागाचे सुमारे पाच कर्मचारी बुधवारी दुपारी गेले होते. चेंबरमधील गॅस बाहेर पडण्यासाठी प्रारंभी ड्रेनेजचे झाकण काढण्यात आले होते. चेंबरमध्ये मोठा रॉड टाकून चेंबर साफ करण्यात येते. यावेळी एक रॉड प्रथम चेंबरमध्ये पडला होता. त्यावेळी तो रॉड बाहेर काढण्यासाठी दोरी आणायला एक कर्मचारी गेला. तेव्हा अनिरूद्ध लाड हा कर्मचारी थेट चेंबरमध्ये कोसळला. हे लक्षात आल्यानंतर दुसरा कर्मचारी त्याला वाचवण्यासाठी चेंबरमध्ये उतरला. मात्र आतील गॅसने तोही गुदमरून बेशुद्ध झाला. हे निदर्शनास आल्यानंतर कर्मचाऱ्यांनी आरडोओरडा करत त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. यावेळी तेथे पोहोचलेल्या विनोद तारू या कर्मचाऱ्याने ऑक्सिजन मशीन घेऊन मास्क लावून चेंबरमध्ये उतरून या दोन्ही कर्मचाऱयांना नागरिक आणि इतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने बाहेर काढले. तोपर्यंत पालिकेचे अग्निशमन दल व रूग्णवाहिका तेथे पोहोचली होती. दोन्ही कर्मचाऱ्यांना घेऊन रूग्णवाहिका प्रथम उपजिल्हा रूग्णालयात प्राथमिक उपचार करून तेथून कृष्णा रूग्णालयात पोहोचली. कृष्णा रूग्णालयात अनिरूद्ध लाड याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तर अमोल चंदनशिवे याच्यावर उपचार सुरू आहेत.
या घटनेचे वृत्त समजताच अनेकांनी घटनास्थळी तसेच रूग्णालयात धाव घेतली. रात्री वेणूताई चव्हाण उपजिल्हा रूग्णालयात उत्तरीय तपासणी करून अनिरूद्ध याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांत नगरपालिकेतर्फे फिर्याद दाखल करण्याचे काम रात्री उशिरा सुरू होते. या घटनेची चौकशी सुरू केली असून मृत कर्मचाऱ्यास लाड कमिटीच्या शिफारशीनुसार मदत मिळवून देणार असल्याचे मुख्याधिकारी डाके यांनी सांगितले.









