नागरिकांचे आरोग्य धोक्यात : अनेकांना उलटी-जुलाबाचा त्रास, समस्या सोडविण्याची मागणी
बेळगाव : चव्हाट गल्ली आणि परिसराला गेल्या पंधरा दिवसांपासून ड्रेनेजमिश्रित गढूळ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून काही जणांना उलटी आणि जुलाबाचा त्रास जाणवू लागला आहे. याबाबत अनेक वेळा महापालिका, एलअँडटी आणि स्थानिक नगरसेवकांकडे तक्रार करूनदेखील या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जात असल्याने रहिवासी संतप्त झाले आहेत.
बेळगाव शहराच्या पाणीपुरवठ्याची जबाबदारी एलअँडटी कंपनीकडे सोपविण्यात आली आहे. 24 तास पाणीपुरवठा करण्याच्या नावाखाली शहर आणि उपनगरात जिकडेतिकडे रस्त्यांची खोदाई केली जात आहे. मात्र, तरीदेखील 24 तास पाणीपुरवठा हे बेळगावकरांसाठी एक दिवास्वप्नच बनून राहिले आहे. 24 तास पाणीपुरवठा तर दूरच उलट आठ ते दहा दिवसांतून एकदा शहराला पाण्याचा पुरवठा केला जात आहे. त्यामुळे एलअँडटीच्या या भोंगळ कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
त्यातच चव्हाट गल्ली आणि परिसरातील नळांना ड्रेनेजमिश्रित गढूळ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. पाण्यातून किडे व जंतू येत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. अशाप्रकारच्या गढूळ पाण्यामुळे नागरिकांना उलटी-जुलाबाचा त्रास जाणवू लागला आहे. याबाबत स्थानिकांनी वारंवार एलअँडटी आणि महापालिकेकडे गढूळ पाण्याबाबत तक्रार करूनदेखील स्वच्छ पाणीपुरवठा करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. ही गंभीर समस्या सोडविण्याऐवजी एकमेकांकडे बोट दाखवून वेळ मारून नेला जात आहे.
या प्रकाराची माहिती चव्हाट गल्ली व परिसरातील रहिवाशांनी स्थानिक नगरसेवकांना देण्यासाठी फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे संतप्त रहिवाशांनी रविवारी चव्हाट गल्ली महिला व नागरिक रस्त्यावर उतरले होते. नळांना येणारे ड्रेनेजमिश्रित गढूळ पाणी बकेट तसेच बाटलीमध्ये भरून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणाऱ्यांचा निषेध करण्यासह ही गंभीर समस्या अधिकाऱ्यांनी तातडीने सोडवावी. तसेच नवीन जलवाहिनी घालण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.









