दुर्गंधीयुक्त पाणी काढताना साऱ्यांचीच उडाली तारांबळ : महापालिकेच्या नावाने शिमगा
बेळगाव : शहराचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश करण्यात आला. स्मार्ट सिटीअंतर्गत विविध विकासकामे राबविण्यात आली. मात्र समस्या सुटण्याऐवजी समस्या वाढतच चालल्या आहेत. त्यामुळे जनता पूर्णपणे त्रासली आहे. ऐन पावसाळ्यात सपार गल्ली, वडगावच्या मागील बाजूला असलेल्या घरांमध्ये ड्रेनेजचे पाणी शिरल्याने एकच तारांबळ उडाली. पाणी काढताना कुटुंबीयांच्या अक्षरश: नाकीनऊ आले. या प्रकारामुळे नागरिकांनी महापालिकेच्या व स्मार्ट सिटीच्या कामाबद्दल तीव्र संताप व्यक्त केला असून त्यांच्या नावाने ऐन पावसाळ्यातच शिमगा केला. ड्रेनेजची समस्या ही नेहमीचीच आहे. वडगाव परिसरात ड्रेनेज आणि पाणी समस्या नित्याची असून त्याकडे महापालिकेचे नेहमीच दुर्लक्ष झाले आहे. ऐन पावसाळ्यात पाण्यासाठी नागरिकांना भटकावे लागत आहे. तर ड्रेनेजचे पाणी घरात शिरून अनेकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या चार दिवसांपासून सुरू झालेल्या दमदार पावसामुळे नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. सपार गल्ली, वडगावच्या मागील बाजूला असलेल्या घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला.
ड्रेनेजचे पाणी चक्क स्वयंपाक घरात शिरल्यामुळे जेवण करणेही अवघड झाले आहे. सर्वत्र दुर्गंधी पसरली होती. त्यामुळे घरात राहणेच कठीण झाले आहे. ड्रेनेजचे दुर्गंधीयुक्त पाणी काढताना मोठी कसरत करावी लागत होती. या प्रकारामुळे अनेकांचे आरोग्यही बिघडले आहे. यावेळी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या. असा प्रकार घडत असेल तर जगायचे कसे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. महापालिकेने तातडीने परिसरातील ड्रेनेजची दुरुस्ती करावी आणि आम्हाला सहकार्य करावे, अशी मागणी केली आहे.
माग व्यावसायिकांचे नुकसान
या परिसरात माग व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे. अनेक कारखाने आहेत. त्या कारखान्यांमध्येही ड्रेनेजचे पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. एक तर महागाईमुळे त्रासलेल्या माग व्यावसायिकांना पावसामुळे आणि ड्रेनेजच्या पाण्यामुळे मोठा फटका बसला असून साड्या तसेच सूतदेखील खराब झाले आहे. काही जणांच्या विद्युत मोटारी आणि मागदेखील खराब झाले आहेत. त्यामुळे तातडीने त्या व्यावसायिकांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.
दोन दिवसांपासून निर्माण झाली समस्या
गेल्या दोन दिवसांपासून ड्रेनेजचे पाणी घरात शिरत आहे. त्यामुळे स्वयंपाक करणे, झोपायचे कोठे? असा प्रश्न आम्हाला निर्माण झाला आहे. घरामध्ये पाणी शिरल्यामुळे सर्व साहित्य भिजून गेले आहे. अंथरुण, कपडेदेखील ओले झाले आहेत. त्यामुळे जीवन जगणेच अवघड झाल्याच्या प्रतिक्रिया कुटुंबीयांतून उमटत आहेत.









