वाहनचालक-नागरिकांतून तीव्र संताप
बेळगाव : स्मार्ट सिटीमध्ये शहरातील विविध रस्त्यांचे तसेच पदपथांचे नूतनीकरण करण्यात आले. मात्र सात वर्षे उलटली तरी अनेक ठिकाणी कामे अर्धवट आहेत. आरपीडी क्रॉस येथे रस्त्याचे काम करण्यात आले. मात्र ठिकठिकाणी तुंबलेल्या ड्रेनेजची व गटारीची दुरुस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे ते पाणी रस्त्यावरुनच वाहात आहे. यामुळे या परिसरातील व्यावसायिक व वाहन चालकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. करोडो रुपये खर्च करून स्मार्ट सिटीची कामे करण्यात आली. मात्र या कामांचा दर्जा किंवा वेग पाहता स्मार्ट सिटी नको म्हणण्याची वेळ बेळगावकरांवर आली आहे. गोवावेस सर्कल ते आरपीडीपर्यंतचा रस्ता तब्बल सहा महिने अर्धवट आहे. त्यामुळे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. गोवावेस सर्कल तर अपघाताचे क्षेत्र बनले आहे. रस्ता करायचा आणि त्यानंतर पुन्हा खोदाई करायची, असे प्रकार सुरू आहेत. याबाबत नागरिकांनी अनेकवेळा तक्रारी केल्या. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. आरपीडी क्रॉस येथे एका बाजूचा रस्ता पूर्ण झाला आहे. तर दुसऱ्या बाजूचा रस्ता अजूनही अर्धवट आहे. महत्त्वाचे म्हणजे ड्रेनेजबाबत काहीच गांभीर्य घेण्यात आले नाही. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी ड्रेनेज ब्लॉक हाऊन पाणी रस्त्यावरुन वाहत आहे. आरपीडी क्रॉस येथेही गेल्या दोन वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे. मात्र त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही. यामुळे तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.









