बेळगाव : स्टेशन रोडवरील हॉटेल्स, लॉज व इतर व्यावसायिकांनी ड्रेनेज कनेक्शन मुजावर गल्लीतील रहिवासी ड्रेनेज लाईनला जोडले आहे. त्यामुळे ड्रेनेज तुंबण्यासह सांडपाणी रस्त्यावर पसरत असल्याने याचा नाहक त्रास रहिवाशांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे येथील व्यावसायिकांना स्टेशन रोडच्या मुख्य ड्रेनेज लाईनला कनेक्शन जोडण्याची सूचना करण्यात यावी, अशी मागणी रहिवाशांनी महापालिकेकडे केली होती. त्यानुसार बुधवारी मनपा अधिकाऱ्यांनी तेथील हॉटेल्स, लॉज चालकांना मुख्य ड्रेनेज लाईनला कनेक्शन जोडण्याची सूचना केली.
स्टेशन रोडवर विविध ठिकाणी हॉटेल्स, लॉजिंग, बोर्डिंग व इतर व्यावसायिक आहेत. त्यांच्याकडून स्टेशन रोडवरील मुख्य ड्रेनेज लाईनला कनेक्शन जोडण्याऐवजी मुजावर गल्लीतील रहिवासी ड्रेनेज लाईनला कनेक्शन जोडले आहे. त्यामुळे वारंवार ड्रेनेज तुंबत आहेत. परिणामी सांडपाणी बाहेर पडून रस्त्यावर पसरत आहे. इतकेच नव्हे तर पिण्याच्या पाण्यातदेखील ड्रेनेज मिसळत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गेल्या कांही वर्षांपासून दुर्गंधी व इतर समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याने ही समस्या सोडविण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन मुजावर गल्ली मजिद मुजावर मोहल्ला यांच्यावतीने मनपा आयुक्त व आमदार असिफ सेठ यांना देण्यात आले होते.
आठ दिवसात मुख्य ड्रेनेजला कनेक्शन जोडण्याचे आश्वासन
त्यानुसार बुधवारी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्टेशन रोडला भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी येथे आठ दिवसात स्वखर्चाने ड्रेनेज कनेक्शन स्टेशन रोडवरील मुख्य ड्रेनेजला करू घेऊ, असे आश्वासन हॉटेल्स व लॉज मालकांना मनपा अधिकाऱ्यांना दिले. यावेळी मनपाचे अधिकारी अनुप, समाजसेवक सिद्धार्थ भातकांडे व गल्लीतील रहिवासी उपस्थित होते.









