दुर्गंधीने नागरिक हैराण, कॅन्टोन्मेंटचे दुर्लक्ष
बेळगाव : ड्रेनेजच्या समस्येने कॅम्पच्या वेस्ट स्ट्रीट येथील नागरिक हैराण झाले आहेत. ड्रेनेजचे सांडपाणी तुंबून राहिल्याने दुर्गंधी पसरली असून कॅन्टोन्मेंट प्रशासनाचा हलगर्जीपणा याला कारणीभूत आहे. लेखी तक्रार देऊनही केवळ तात्पुरत्या स्वरुपात दुरुस्ती केली जाते. परंतु काही दिवसात पुन्हा ड्रेनेजची समस्या निर्माण होत आहे. कॅन्टोन्मेंट प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे कॅम्प भागात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. पाणी, गटारी, रस्ते व पथदीप यांच्या समस्यांनी नागरिक हैराण आहेत. वेस्ट स्ट्रीट येथे मागील अनेक महिन्यांपासून ड्रेनेजची समस्या उद्भवली आहे.
एका खासगी घराच्या चेंबरमधून सांडपाणी झिरपले जात असून त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. आजुबाजूच्या घरातील नागरिकांनी घरात बसणेही अशक्य होत आहे. स्थानिकांनी लेखी तक्रार कॅन्टोन्मेंट बोर्डकडे दिली आहे. परंतु त्यांच्याकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे. तक्रार केली की तात्पुरत्या स्वरुपात दुरुस्ती केली जाते. परंतु पुन्हा समस्या निर्माण होत असल्याने नागरिकांकडून कायमस्वरुपी दुरुस्तीची मागणी होत आहे. कॅन्टोन्मेंट अधिकाऱ्यांना दुरुस्तीसाठी फोन केला असता त्यांच्याकडून चालढकल अथवा योग्य प्रतिसाद दिला जात नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
पथदीप अनेक दिवसांपासून बंद
वेस्ट स्ट्रीट येथे केवळ सांडपाणीच नाही तर पथदीप नसल्याने समस्या निर्माण झाली आहे. मागील आठवड्याभरापासून या परिसरातील पथदीप बंद आहेत. यामुळे भुरट्या चोऱ्यांचा वावर वाढला आहे. त्यामुळे कॅन्टोन्मेंटने लक्ष पुरवून याठिकाणचे पथदीप पुन्हा सुरू करावेत, अशी मागणी करण्यात येत आहे.









