सर्वत्र दुर्गंधी, पादचाऱ्यांना त्रासदायक
बेळगाव : आरपीडी कॉर्नरजवळ ड्रेनेज वाहिनीला गळती लागल्याने दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर वाहत आहे. त्यामुळे येथून ये-जा करणाऱ्या पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. पाणी रस्त्यावर वाहत असल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ लागला आहे. धुवाधार पावसामुळे शहरातील गटारी आणि ड्रेनेजची समस्या समोर आली आहे. अनेक ठिकाणी ड्रेनेज आणि गटारीतून पाण्याचा निचरा झाला नसल्याने अडचणी वाढल्या आहेत. त्यातच आरपीडी कॉर्नरजवळ ड्रेनेजला गळती लागून दुर्गंधीयुक्त पाणी वाहत असल्याने समस्या निर्माण झाली आहे. मनपाच्या उदासीन कारभारामुळे शहरवासिय हैराण झाले आहेत. तातडीने ड्रेनेजची दुरुस्ती करून दिलासा द्यावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.









