बेळगाव : गेल्या काही महिन्यांपासून माळी गल्ली, आझाद गल्ली, कामत गल्ली, दर्गा गल्ली परिसरातील ड्रेनेजची समस्या गंभीर बनली आहे. याचबरोबर दूषित पाणी पुरवठा केला जात आहे. यामुळे नगरसेविका ज्योती कडोलकर यांना बोलावून घेऊन त्याची संपूर्ण माहिती देण्यात आली. यावेळी निधी नसल्यामुळे समस्या निर्माण झाल्या आहेत. लवकरच या समस्या सोडवू, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. ड्रेनेजच्या पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे या परिसरात गंभीर समस्या निर्माण झाली आहे. याबाबत अनेकवेळा महानगरपालिकेला कळविण्यात आले. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले आहे. रस्तेही खराब झाले आहेत. या रस्त्यांची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. गणेशोत्सवपूर्वी या समस्या सोडवाव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.
समस्या तातडीने सोडविण्याची ग्वाही
नगरसेविकेबरोबरच एल अँड टी कंपनीचे आणि महानगरपालिकेचे अधिकारीही याप्रसंगी उपस्थितहोते. त्या सर्वांनाच नागरिकांनी जाब विचारला. त्यामुळे नगरसेविका व अधिकाऱ्यांनी या सर्व समस्या तातडीने सोडवू, असे स्पष्ट केले.
किमान 30 लाख निधीची गरज
या कामासाठी किमान 30 लाख रुपये निधी लागणार आहे. सध्या फंड नसल्यामुळे समस्या निर्माण झाली असून महानगरपालिकेकडे पाठपुरावा करू, असे आश्वासन दिले. यावेळी लक्ष्मण मेटी, सादिक धारवाडकर, युसूफ देसाई यांच्यासह इतर नागरिक उपस्थित होते.









