एपीएमसी रस्त्यावरील प्रकार : पादचाऱ्यांसाठी धोका
बेळगाव : स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहरामध्ये विकासकामे राबविण्यात आली असली तरी अनेक ठिकाणी अर्धवट सोडण्यात आलेल्या विकासकामांमुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे स्मार्ट सिटी योजना सोयीची ठरण्याऐवजी गैरसोयीचीच अधिक होत आहे. एपीएमसी रस्त्यावरील सायकल ट्रॅकवरील ड्रेनेजची झाकणे गायब झाल्याने सायकल ट्रॅक ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. संगमेश्वरनगर ते एपीएमसी प्रवेशद्वारापर्यंतच्या रस्त्याच्या दुतर्फा सायकल ट्रॅक निर्माण करण्यात आला आहे. रस्ता व पदपथाचे काम पूर्ण झालेले आहे. मात्र, सायकल ट्रॅकवरील ड्रेनेजची झाकणे गायब झाल्याने सायकल ट्रॅक बिनकामाचा ठरला आहे. तर पादचाऱ्यांसाठीही हा ट्रॅक धोकादायक ठरत आहे. सायकल चालकांसाठी ट्रॅक निर्माण करण्यात आला असला तरी त्याचा अपेक्षेनुसार उपयोग होताना दिसत नाही. सोयीऐवजी गैरसोयीचा ठरत आहे. ड्रेनेजची झाकणे गायब झाल्याने रात्रीच्यावेळी अंधारात ये-जा करणाऱ्या नागरिकांनाही हा ट्रॅक धोकादायक ठरत आहे. स्मार्ट सिटी योजनाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.









