बांधकामामुळे वाहतुकीला अडथळा
बेळगाव : खडेबाजार येथे भररस्त्यात ड्रेनेज चेंबर बांधण्यात येत आहे. शहराची स्मार्ट सिटीअंतर्गत विकासकामे झाली असली तरी काही ठिकाणी ड्रेनेजची समस्या सातत्याने डोकेवर काढू लागली आहे. त्यामुळे मनपा प्रशासनाला याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शहरात अमृत योजनेंतर्गत जलवाहिन्या, ड्रेनेज वाहिन्यांचा विकास साधण्यात आला आहे. मात्र काही ठिकाणी ड्रेनेजला गळती तर काही ठिकाणी ड्रेनेज चेंबर फुटून समस्या निर्माण होत आहेत. भररस्त्यात ड्रेनेज गळतीमुळे वाहतुकीला अडचणी येऊ लागल्या आहेत. काही ठिकाणी ड्रेनेजची झाकणे खुली आहेत. त्यामुळे समस्या निर्माण होत आहे. खडेबाजार येथे भररस्त्यात ड्रेनेजच्या चेंबरसाठी बांधकाम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ लागला आहे. आधीच वाहतूक कोंडीचा प्रश्न सातत्याने भेडसावू लागला आहे. त्यातच ड्रेनेज चेंबरच्या कामामुळे भर पडू लागला आहे. शहरात ड्रेनेज चेंबर आणि झाकणांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विविध ठिकाणी चेंबरच्या समस्या निर्माण होऊन सांडपाणी रस्त्यावरून वाहू लागले आहे. काही ठिकाणी झाकण नसलेले चेंबर लहान मुलांसाठी धोकादायक ठरू लागले आहेत. त्यामुळे मनपा प्रशासन यासाठी कोणती उपाययोजना राबविणार, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.









