वाहनधारकांना धोका : दुरुस्ती करण्याची मागणी
बेळगाव : एसपीएम रोडवर ड्रेनेज चेंबरच्या झाकणाची दुर्दशा झाल्याने वाहनधारकांना धोका निर्माण झाला आहे. विशेषत: रात्रीच्यावेळी चेंबरचे झाकण लक्षात येत नसल्याने अपघाताचा धोका आहे. भर रस्त्यातच चेंबरचे झाकण खचल्याने ये-जा करणेही अडचणीचे ठरू लागले आहे. तातडीने चेंबरचे झाकण सुरळीत करून दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे. गजाननराव भातकांडे इंग्रजी माध्यम शाळेच्या समोरच या ड्रेनेज चेंबर झाकणाची समस्या निर्माण झाल्याने विद्यार्थ्यांनाही धोका निर्माण होऊ लागला आहे. शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत ड्रेनेज वाहिन्यांचा विकास साधला गेला आहे. तर दुसरीकडे ड्रेनेजच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढू लागल्या आहेत. रस्त्यातच ड्रेनेज व त्यावरील झाकणांची समस्या शहरवासियांसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे.









