आमदारांनी सूचना केल्याने महापालिकेकडून काम सुरू, शेतकऱ्यांमध्ये पसरले समाधान
बेळगाव : लेंडी नाल्याचे पाणी निचरा होण्यास अडथळे ठरत असलेले राष्ट्रीय महामार्गानजीकचे पाईप अखेर महापालिकेने खुले केले. आमदार आसिफ सेठ यांच्या सूचनेनुसार गुरुवारी महानगरपालिकेचे दोन पाईप खुले केल्याने पाण्याचा निचरा होऊ लागला. उर्वरित पाईप शुक्रवारी खुले करण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त केले जात आहे. पावसाममुळे लेंडी नाल्यामध्ये पाण्याचा प्रवाह अचानक वाढला. नाल्यावर झालेल्या अतिक्रमणामुळे हे पाणी पूर्णपणे शिवारात शिरून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. राष्ट्रीय महामार्गानजीक नाल्याचे पाणी पुढे जाण्यास जागा उपलब्ध नसल्याने पाणी तसेच साचून होते. शेतकऱ्यांनी अनेक वेळा विनंती करून देखील महामार्गाच्या पलीकडे पाईप खुले करण्यात आले नव्हते. पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने बुधवारी मोठ्या प्रमाणात शिवारात पाणी शिरले.
नाल्यातील पाणी निचरा होण्यास सुरुवात
गुरुवारी नारायण सावंत यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार असिफ शेठ यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सूचना करून पाईप खुले करण्यास सांगितले. महापालिका अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर यांनी विशेष लक्ष पुरवल्यामुळे गुरुवारी दोन पाईप खुले करण्यात आले. त्यामुळे नाल्यातील बरेचसे पाणी निचरा होण्यास सुरुवात झाली आहे.
फुटलेल्या ठिकाणी नाला दुरुस्त करण्याची मागणी
समर्थ नगर, टीचर्स कॉलनी तसेच खासबाग परिसरात अनेक ठिकाणी लेंडी नाला फुटला आहे. सध्या पावसाचे प्रमाण अधिक असल्यामुळे मोठ्या प्रमाणात नाल्यामध्ये पाणी आहे. हे पाणी सध्या शिवारांमध्ये शिरत असल्याने महानगरपालिकेने तात्काळ ज्या ज्या ठिकाणी नाला फुटला आहे त्या त्या ठिकाणी दुरुस्ती करावी अशी मागणी बेळगाव शेतकरी संघटनेने केली आहे.









