गाळ, जलपर्णी जेसीबीच्या साहाय्याने हटविली : महापौर, उपमहापौरांकडून पाहणी
बेळगाव : मुसळधार पावसामुळे जिकडे तिकडे पाणीच पाणी झाल्याने महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. त्यामुळे शहर व उपनगरातील नाल्यांची सफाई करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या बळ्ळारी नाल्यावरील पुलाखालील गाळ आणि जलपर्णी काढण्याच्या कामाला गुरुवारपासून महापालिकेने सुरुवात केली आहे. त्यामुळे नागरिक आणि शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त केले जात असले तरी पावसाळ्यापूर्वी बळ्ळारी नाल्याची सफाई करणे गरजेचे होते. बळ्ळारी नाल्याचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून भिजत पडला आहे. बळ्ळारी नाल्याला पूर आल्यास दरवर्षी येळ्ळूर, वडगाव, माधवपूर, शहापूर, जुने बेळगाव आदी परिसरातील शेती पाण्याखाली जाऊन पिकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे बळ्ळारी नाल्याची सफाई करून रुंदी वाढविण्यात यावी. त्याचबरोबर नाल्याच्या दोन्ही बाजूंनी काँक्रिटीकरण करण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांतून गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे. मात्र या गंभीर प्रश्नाकडे लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासनाने साफ दुर्लक्ष केले आहे.
यापूर्वी पालकमंत्री सतीश जारकीहोळी, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन व इतर अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन बळ्ळारी नाल्याचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. मात्र हा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. दरवर्षी हजारो रुपये खर्च करून शेतकरी पिकांची लागवड करतात. मात्र ऐनवेळी बळ्ळारी नाल्यास पूर येऊन पिके पाण्याखाली जात आहेत. बळ्ळारी नाल्याचा पूर लवकर न ओसरल्यास अनेकवेळा पिके कुजून जाण्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना दरवर्षी दुबार किंवा तिबार पेरणी करण्याची वेळ येत आहे. बळ्ळारी नाल्याच्या सफाईकडे दुर्लक्ष केलेल्या महानगरपालिकेने गुरुवारी बळ्ळारी नाल्यावरील येळ्ळूर, यरमाळ, धामणे येथील पुलाखालील गाळ, केरकचरा आणि जलपर्णी काढण्याचे काम जेसीबीच्या साहाय्याने सुरू केले आहे. केरकचरा हटविण्यात आल्याने पाणी वाहून जाण्यास मदत होणार असली तरी नाल्याच्या मध्यभागी जलपर्णी तशाच आहेत. त्यामुळे पाणी वाहून जाण्यास अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. नाल्याच्या सफाईचे काम सकाळी धामणे रोडवरील ब्रिजपासून सुरू करण्यात आले. यावेळी महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी जोशी,समिती नेते रमाकांत कोंडुस्कर, माजी नगरसेवक मनोहर हलगेकर, महापालिकेचे साहाय्यक पर्यावरण अभियंता हनुमंत कलादगी यांसह इतर अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.









