आटपाडी प्रतिनिधी
आटपाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये माजी संचालक पंढरीनाथ नागणे यांच्या मंगलमुर्ती फळबाग संघाच्या अडत दुकानात डाळिंबासह ड्रॅगन फ्रुटचीही आवक झाली. महुद(ता.सांगोला) येथील शेतकरी वैभव लवटे यांच्या ड्रॅगन फ्रुटला आटपाडीच्या सौदे बाजारात 121 आणि 111 रूपये प्रति किलो असा दर मिळाला.
आटपाडी बाजार समितीच्या डाळिंब सौदे बाजारात यापुर्वी डाळिंबासह चिक्कु, सिताफळ, पेरू आदि फळांची आवक झाली होती. शिवाय सरफचंदचाही लिलाव करण्यात आला होता. आत्ता मंगलमुर्ती फळबाग संघाने ड्रॅगन प्रुटलाही व्यासपीठ देत त्याच्या विक्रीची संधी शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिल्याची माहिती पंढरीनाथ नागणे यांनी दिली. महूद (ता.सांगोला जि.सोलापुर) येथील शेतकरी वैभव वसंत लवटे यांच्या ड्रॅगन फ्रुट या फळाला येथे चांगला दर प्राप्त झाला.
माण तालुक्यातील भालवडी(शिंगणापूर) येथील शेतकरी अजय सुभाष काटे यांच्या डाळिंबाला प्रतिकिलो 251, 121, व 81 असा दर मिळाला. नातेपुते येथील शेतकरी बाबुराव पानसकर यांच्या डाळिंबाला प्रतिकिलो 210, 120, 85, 55 असा दर सौदे बाजारात मिळाला. दिघंची येथील मधुकर शिवदास शेटे यांच्या डाळिंबाला प्रतिकिलो 150, 85, 65, 37 रूपये असा दर मिळाला.
आटपाडीच्या सौदे बाजारात सध्या डाळिंबाची आवक वाढलेली आहे. इतर पिकांपेक्षा डाळिंब पिकात उत्पन्न जास्त असल्याने विविध अडचणीवर मात करून शेतकरी डाळिंब लागवडीत पुन्हा जोमाने उभा राहत असल्याचे पंढरीनाथ नागणे यांनी स्पष्ट केले. मोठ्या प्रमाणात बाहेरील भागातून डाळिंब आवक आटपाडी बाजार समितीच्या सौदे बाजारात वाढलेली आहे. त्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी मंगलमुर्ती फळबाग संघ, मंगलमुर्ती उद्योग समुह प्रयत्नशील असल्याचे संस्थापक पंढरीनाथ नागणे यांनी सांगितले.
शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना बागेतच माल देण्यापेक्षा आटपाडीच्या सौदे बाजारात माल आणून चांगला भाव प्राप्त करावा. असे आवाहनही माजी संचालक पंढरीनाथ नागणे यांनी केले. याप्रसंगी व्यापारी वसंत खराडे, सागर नागणे, सुनील सरगर, माणिक सरगर, दत्ता मरगळे, लक्ष्मण पुजारी, विठ्ठल चवरे, औदुंबर महानवर, देवा लांडगे, उत्तम काळे, नंदकुमार हाके, सुनील काळे, आकाश माळी यांच्यासह शेतकरी, व्यापारी उपस्थित होते.