पुणे / प्रतिनिधी :
परदेशी विद्यापीठांतून मिळविलेल्या पदवी अभ्यासक्रमांना मान्यता आणि समकक्षता देण्यासाठीच्या नियमावलीचा विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) मसुदा प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार नियमित पद्धतीने अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या आणि निकष पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पदव्यांना समकक्षता दिली जाणार आहे, तर दूरस्थ आणि ऑनलाइन पद्धतीने, फ्रँचायझी कराराद्वारे मिळविलेल्या पदव्या प्रतिबंधित करण्यात आल्या आहेत. अभ्यासक्रमांना समकक्षता प्रदान करण्यासाठी यूजीसीकडून स्वतंत्र संकेतस्थळाची निर्मिती करण्यात येणार आहे.
परदेशी विद्यापीठांना भारतात प्रवेश, भारतीय विद्यापीठांसह परदेशी विद्यापीठांना दुहेरी किंवा संयुक्त पदवी अभ्यासक्रम सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर हा मसुदा प्रसिद्ध करण्यात आला. त्यात परदेशातील शिक्षण मंडळांशी संलग्न शाळांतून, परदेशी उच्च शिक्षण संस्थांच्या संकुलातून प्राप्त केलेली शैक्षणिक पात्रता ओळखण्याचे निकषही निश्चित करण्यात आले आहेत. या मसुद्यावर हरकती सूचना नोंदवण्यासाठी 16 सप्टेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
परदेशातील विद्यापीठातून मिळवलेल्या पदवी अभ्यासक्रमाला मान्यता आणि समकक्षता मिळण्यासाठी विद्यार्थ्याने नियमित पद्धतीने शिक्षणाद्वारे अभ्यासक्रम पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे. या अभ्यासक्रमाचा प्रवेश भारतातील अभ्यासक्रमानुसार असावा. भारतातील आणि परदेशातील अभ्यासक्रमाचा किमान कालावधी, किमान श्रेयांक आणि मूल्यांकन प्रक्रिया यातील समानतेच्या आधारावर प्रवेशातील समानता यूजीसीकडून स्थापन केलेल्या स्थायी समितीकडून निश्चित केली जाईल. अभ्यासक्रमाच्या विविध श्रेणीतील श्रेयांक तपासून समानता निश्चित केली जाऊ शकते. मात्र, भारतातील आणि परदेशातील अभ्यासक्रमाचा किमान कालावधी समान असणे आवश्यक आहे. किमान कालावाधी समान नसल्यास किमान श्रेयांक विचारात घेतले जातील. त्यात श्रेयांकाची व्याख्या तपासून दर आठवडय़ाचे तास, स्वयंअध्ययनाचे तास, अनुभवसिद्ध शिक्षणाचा कालावधी विचारात घेतला जाईल. परदेशी विद्यापीठातून मिळवलेल्या पदवीच्या समकक्षतेसाठी यूजीसीकडून स्वतंत्र संकेतस्थळाची निर्मिती केली जाईल, असे नमूद करण्यात आले आहे.
परदेशी विद्यापीठातील पदवीला देण्यात आलेल्या समकक्षता प्रमाणपत्राद्वारे त्याच स्तरावर भारतीय शिक्षण मंडळ किंवा विद्यापीठाने दिलेली पदवी यांच्यातील पात्रतेची समता प्रमाणित केली जाईल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवेश किंवा नोकरीसाठी समकक्षता प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.








