तळेरे : प्रतिनिधी
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने २०२० च्या पुरस्कारासाठी दासबोध साहित्याचे थोर अभ्यासक आणि ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे राज्य अध्यक्ष डॉ. विजय लाड, नांदेड यांच्या ‘दासबोध चिंतनसार’ या दासबोधावरील ग्रंथाची निवड करण्यात आली आहे, असे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाहक उद्धव कानडे प्रभारी प्रमुख कार्यवाह सुनिता राजे पवार व कार्याध्यक्ष मिलिंद जोशी यांनी जाहीर केला आहे.
हा पुरस्कार महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृत मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमात सोमवार दिनांक १७ जुलै रोजी सायंकाळी साडेपाच वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात दिला जाणार आहे. या पुरस्काराचे स्वरूप सात हजार रुपये रोख व सन्मानपत्र असे आहे
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने तत्त्वज्ञान अध्यात्म शास्त्र मानसशास्त्र योग किंवा नीती या विषयाशी संबंधित उत्कृष्ट ग्रंथास डॉ. म. वि. गोखले पुरस्कृत प्राचार्य सोनोपंत तथा मामासाहेब दांडेकर पुरस्काराने गौरविले जाते. या वर्षी डॉ. विजय लाड यांच्या दासबोध चिंतनसार या ग्रंथास हा पुरस्कार दिला आहे.









