कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांच्याकडून नियुक्तीपत्र प्रदान; मुलाखतीसाठी 16 पैकी 14 उमेदवारांनी दिली मुलाखत
कोल्हापूर प्रतिनिधी
शिवाजी विद्यापीठ कुलसचिव पदाच्या मुलाखती मंगळवारी पार पडल्या 16 पैकी 14 उमेदवार मुलाखतीसाठी उपस्थित होते. निवड समितीने मुलाखतीनंतर शिवाजी विद्यापीठाच्या कुलसचिवपदी डॉ. व्ही. एन. शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली. कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांनी डॉ. शिंदे यांना नियुक्तीपत्र प्रदान करूनन अभिनंदन केले. भावी कारकीर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.
डॉ. व्ही. एन. शिंदे यांना प्रशासकीय कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे सन 2010 ते 2012 या कालावधीत कुलसचिवपद भूषविले. शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव म्हणूनही त्यांनी प्रशासकीय कामकाजाचा ठसा उमटविला आहे. विद्यापीठाच्या सोलापूर येथील पदव्युत्तर शिक्षण केंद्रासह विद्यापीठाच्या विविध विभागांचे उपकुलसचिव म्हणून कार्यरत होते. सध्या सभा, निवडणुका आणि उद्यान विभागांसह प्रभारी कुलसचिव पदाचे कामकाजही पाहातात. तत्पूर्वी, बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय आणि शिवाजी विद्यापीठाचा पदार्थविज्ञान अधिविभागात पदार्थविज्ञान शास्त्राचे पाच वर्षे अधिव्याख्याता होते. डॉ. शिंदे शिवाजी विद्यापीठाचे विद्यार्थी असून एम्.एस्सी. (भौतिकशास्त्र) परीक्षेत विद्यापीठात प्रथम होते. क्रायोजेनिक्स विषयातील विकासात्मक संशोधनासाठी प्रा. एम्. सी. जोशी पुरस्काराचे ते सहमानकरी आहेत. वृक्षलागवड आणि वृक्षसंवर्धन हे त्यांचे जिव्हाळ्याचे विषय असून विद्यापीठ जलयुक्तीसाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. विज्ञान साहित्यिक म्हणूनही डॉ. शिंदे लोकप्रिय असून, एककांचे मानकरी, असे घडले भारतीय शास्त्रज्ञ, हिरव्या बोटांचे किमयागार, आवर्त सारणी व मूलद्रव्यांची दुनिया आणि एककांचे इतर मानकरी ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांना महाराष्ट्र शासनाच्या यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कारांमधील विज्ञान साहित्यासाठीचा ‘महात्मा जोतीराव फुले पुरस्कार‘ प्राप्त झाला आहे. त्याचबरोबर जी. डी. कुलकर्णी पारितोषिक‘, विकासात्मक संशोधनाबद्दल ‘इंडियन क्रायोजेनिक्स कौंसिल‘चे ‘प्रा. एम.सी. जोशी पारितोषिक‘, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचा ‘कृ.गो. सूर्यवंशी साहित्य पुरस्कार,‘ मिरजेच्या चैतन्य शब्दांगण साहित्य गौरव पुरस्कारांतील कै. अशोक कोरे स्मृती पुरस्कार, जलसंधारण कार्याबद्दल एन्वायर्नमेंट काँझर्वेशन अँड रिसर्च ऑर्गनायझेशन, चिखली यांचा ‘वसुंधरा पुरस्कार‘ आणि विज्ञान प्रसारासाठी लेखन आणि कार्यासाठी इंडियन फिजिक्स असोसिएशन, पुणे यांचा मो. वा. चिपळोणकर पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
सर्व घटकांना सोबत घेऊन मातृसंस्थेचा लौकिक उंचावणार
शिवाजी विद्यापीठ ही माझी मातृसंस्था असून तिचा लौकिक उंचावण्यासाठीच मी आजवर काम करीत आलो आहे. या संस्थेच्या कुलसचिव पदाची जबाबदारी ही माझ्या दृष्टीने सर्वोच्च संधी असून येथील सर्व घटकांना सोबत घेऊन यापुढील काळात काम करण्यास प्राधान्य राहील. ही संधी दिल्याबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू प्र-कुलगुरू यांच्याप्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो.
डॉ. विलास शिंदे (नूतन कुलसचिव, शिवाजी विद्यापीठ)









