प्रतिनिधी /फातोर्डा
लेखिका आणि शिक्षिका डॉ. तन्वी कामत बांबोळकर यांच्या चार पुस्तकांचा प्रकाशन सोहळा आज शनिवार 3 रोजी सायंकाळी 4 वा. रवींद्र भवन, मडगावच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये होणार आहे. ’पांवळी’ हा काव्यसंग्रह, ’शॉर्ट्स’ हे लघुकथांचे पुस्तक आणि ’लॉगआवट’ व ’अनवाणी’ ही नाटकांची दोन पुस्तके अशा एकूण 4 पुस्तकांचा प्रकाशन सोहळा यावेळी होणार आहे. प्रसिद्ध नाटककार व लेखक शफाअत खान प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. लेखिका डॉ. योगिनी आचार्य, कवी अमेय नाईक आणि नाटककार गौतम गावडे पुस्तकांविषयी बोलणार आहेत. डॉ. तन्वी कामत बांबोळकर यांनी लोकनाटय़ात पीएच.डी. केली आहे आणि सध्या केपे मधील सरकारी महाविद्यालयात त्या विद्यादानाचे काम करत आहेत. या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्रकाशक संजना पब्लिकेशन्स यांनी केले आहे.









