प्रतिनिधी /पणजी
दरवर्षी राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात समाजोन्नती संघटनेतर्फे दिला जाणारा ‘समाजमित्र’ पुरस्कार यावर्षी डॉ. सोमनाथ कोमरपंत यांना प्रदान करण्यात येणार आहे. तसेच निवृत्त सनदी अधिकारी, समाजसेवक आणि पर्वरी संत रोहिदास प्रगती मंडळाचे अध्यक्ष काशिनाथ अर्जुन सातार्डेकर आणि राष्ट्रपतीपदक विजेते पोलीस निरीक्षक विजयनाथ आनंद कवळेकर यांनाही सन्मानित करण्यात येणार आहे.
दि. 2 ऑक्टोबर रोजी संघटनेतर्फे पणजी येथे आयोजित एका खास कार्यक्रमात या तीनही व्यक्तींना गोवा राज्याचे समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांच्याहस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.
संघटनाध्यक्ष शंभू भाऊ बांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. बैठकीला संघटनेचे पदाधिकारी सर्वश्री महेश चव्हाण, विराज बांदेकर, ध्रुव कुडाळकर, राजेश चव्हाण, सुनील मोचेमाडकर आदींनी सहभाग घेतला.








