आरसीयूमध्ये ‘मराठी भाषेतील नवीन संशोधन बदल’ यावर व्याख्यान
प्रतिनिधी/ बेळगाव
संशोधकाची भूमिका चिकित्सक असावी. त्यांनी सजग, प्रामाणिकपणे कष्ट घेऊन संशोधन कार्य करावे. मार्गदर्शकांच्या सूचनांचे पालन करत रहावे. तांत्रिक बाबींकडेही पाहणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठातील मराठी विभागप्रमुख प्रा. तुकाराम रोंगटे यांनी केले. राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या मराठी विभागाच्यावतीने आयोजित मराठी भाषेतील नवीन संशोधन बदल या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. व्यासपीठावर मराठी विभागप्रमुख डॉ. मनीषा नेसरकर, माजी मराठी विभागप्रमुख डॉ. विनोद गायकवाड, डॉ. चंद्रकांत वाघमारे, डॉ. मैजुद्दीन मुतवल्ली, डॉ. संजय कांबळे उपस्थित होते.
डॉ. तुकाराम रोंगटे म्हणाले, संशोधन करण्यासाठी मला वेळ मिळत नाही हे संशोधकाने सांगू नये. मार्गदर्शक नेहमी आपल्या चांगल्यासाठी सांगत असतात. संशोधकाने आपल्या विषयाची संबंधित नियतकालिकात माहिती आली आहे का? ते नेहमी पाहावे. वाचन करताना महत्त्वाच्या गोष्टींची टिप्पणी करावी, यामुळे काम सोपे होत जाते. संशोधकाने ग्रंथ खरेदी करावेत, जे काही मिळेल ते जतन करावे. आपल्या विषयासंबंधी सेव्ह ऐवज पहिल्यांदा मिळवावा. कोणतेही महत्त्वाचे विधान करताना संदर्भ महत्त्वाचा आहे. लिहिताना वाक्मय रचना पाहावी. तुम्ही संशोधनासाठी वेळ दिलाच पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
प्रारंभी डॉ. वाघमारे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. गायकवाड यांनीही विद्यार्थ्यांना संशोधन कसे करावे याची माहिती दिली. डॉ. नेसरकर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी साहित्यिक रा. रं. बोराडे यांना श्र्रद्धांजली अर्पण करण्यात आली. पीएचडीचे विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.









