बेळगाव : भाजपचे बेळगाव उत्तरचे उमेदवार डॉ. रवी पाटील यांनी उत्तर मतदारसंघात भव्य रोडशोमधून शक्तिप्रदर्शन केले. शेकडोंच्या संख्येने कार्यकर्ते रोड शोमध्ये सहभागी झाले होते. भाजप हा सर्वसमावेशक पक्ष असून राज्यात भाजपचीच सत्ता येणार तसेच डॉ. रवी पाटील मोठ्या मताधिक्क्याने निवडून येतील, असा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. राणी चन्नम्मा सर्कल, काकतीवेस रोड, गणपत गल्ली, मारुती गल्ली, हुतात्मा चौकसह शहराच्या मध्यवर्ती भागातून रोड शो काढण्यात आला. भाजपने आजवर विकासाला महत्त्व दिल्याने मागील पाच वर्षांत बेळगाव विकासाच्यादृष्टीने पुढे आले. पुढेही भाजपचीच सत्ता येणार असून बेळगाव उत्तरचा कायापालट करू असा विश्वास डॉ. रवी पाटील यांनी व्यक्त केला. बुधवारी सकाळी माळमारुती परिसरात त्यांनी जोरदार प्रचार केला. मतदारांच्या घरोघरी जाऊन चर्चा केली. एकदा संधी द्या, त्या संधीचे सोने करीन, असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांच्या सोबत महापालिकेचे सत्ताधारी गटाचे नेते राजशेखर डोणी उपस्थित होते. शहरी भागासह झोपडपट्टी भागातही समस्या जाणून घेण्यात आल्या. सायंकाळी मठ गल्ली, कलमठ रोड, अनंतशयन गल्ली, कुलकर्णी गल्ली, शेरी गल्ली, शिवाजी रोड, कोनवाळ गल्ली, टिळक चौक, तानाजी गल्ली या ठिकाणी प्रचार केला. विविध युवक मंडळे, महिला मंडळांनी पाठिंबा दर्शवत विजयी करण्याचा निर्धार केला. बेळगाव उत्तरमध्ये भाजपने विकास केला असून त्या आधारेच आम्ही विजयी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
आज येडियुराप्पा साधणार जनतेशी संवाद
माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा गुरुवारी बेळगावात येणार असून सकाळी 10 वाजता धर्मनाथ भवन येथे जनतेशी संवाद साधणार आहेत. सकाळीच्या सत्रात बसव कॉलनी, वैभवनगर परिसरात प्रचार केला जाणार आहे. सायंकाळी कोनवाळ गल्ली, रामलिंगखिंड गल्ली, बसवाण गल्ली, देशपांडे गल्ली, किर्लोस्कर रोड, रामदेव गल्ली, खडेबाजार, बापट गल्ली, कडोलकर गल्ली, बुरुड गल्ली, गणपत गल्ली, मारुती गल्ली या परिसरात प्रचार केला जाणार असून कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.









