भरघोस मतांनी निवडून देण्याचा निर्धार : मतदारसंघात मतदारांच्या घेतल्या गाठीभेटी
बेळगाव : उत्तर मतदारसंघातील भाजपचे अधिकृत उमेदवार डॉ. रवी पाटील यांच्या प्रचारार्थ शिवबसवनगर परिसरात फेरी काढण्यात आली. तसेच मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाकरिता भाजपच्या अधिकृत उमेदवाराला निवडूण द्या, असे आवाहन करण्यात आले. आवाहनाला प्रतिसाद देत भरघोस मतांनी निवडून देण्याचा विश्वास मतदारांनी व्यक्त केला. डॉ. रवी पाटील यांचा जोरदार प्रचार सुरू असून प्रत्येक भागातील नागरिकांपर्यंत पोहचून मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. भाजप सत्तेवर असताना मतदारसंघाचा विकास केला आहे. उर्वरित विकासकामे पूर्ण करण्याकरिता डॉ. रवी पाटील यांना निवडून देण्याचे आवाहन केले. शिवबसवनगरचा विकास करण्याची गरज असून ही कामे करण्यास कटिबद्ध असल्याचे सांगितले. यावेळी काँग्रेस पक्षाच्या ध्येयधोरणाची माहिती देऊन आजवर झालेल्या विकासकामाचा लेखाजोखा जनतेला माहिती आहे. त्यामुळे भरघोस मतदान करून डॉ. रवी पाटील यांना निवडून देण्याचे आवाहन आमदार अनिल बेनके यांनी प्रचारादरम्यान केले. यावेळी मतदारसंघातील शेकडो कार्यकर्ते प्रचारात सहभागी झाली होते.









