तथ्य शोध समितीच्या अहवालानंतर झाली कारवाई : विद्यार्थ्यीनीसाठी प्रश्नपत्रिका फोडल्याचा आरोप
पणजी : गोवा विद्यापीठाने भौतिकशास्त्र आणि उपयोजित विज्ञान शाळेशी संलग्न असलेले सहाय्यक प्राध्यापक डॉ. प्रणव नाईक यांना अखेर निलंबीत केले आहे. आपल्या मर्जितील प्रश्नपत्रिका फोडणे या सहाय्यक प्राध्यापकाच्या अंगलट आले आहे. प्रश्नपत्रिका फोडण्याचे हे प्रकरण उघडकीस येताच राज्यात मोठी खळबळ माजली आहे. विविध राजकीय पक्ष तसेच विद्यार्थी मंडळानी त्या सहाय्यक प्राध्यापकांना निलंबित करण्याची मागणी लावून धरली होती. अखेर राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले. या प्रकरणातील तथ्य शोध समितीचा अहवाल मागवून सहाय्यक प्रध्यापकाला निलंबनाचा आदेश जारी केला. निलंबनाचा आदेश पुढील सूचना येईपर्यंत लागू राहील.
समितीच्या अहवालानंतर कारवाई
या प्राध्यापकाने एका विद्यार्थीनीला मदत करण्यासाठी परीक्षेची प्रश्नपत्रिका लीक केल्याच्या आरोपानंतर, गोवा विद्यापीठाने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तथ्य शोध समितीमार्फत चौकशी सुरू केली होती. विद्यार्थीनीला जादा गुण मिळावे म्हणून प्रश्नपत्रिका चोरल्याचा आरोप संशयित प्राध्यापकावर आहे.
विद्यार्थी संघटनांकडून निषेध
राष्ट्रीय विद्यार्थी संघ गोवा विभागाने या प्राध्यापकांना निलंबित करण्याची आणि कायदेशीर कारवाईची मागणी करत आगशी पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने प्राध्यापकांना निलंबित करण्याची मागणी केली होती, त्याचबरोबर विद्यार्थीनीची हाकलपट्टी करण्याची मागणी करत विद्यापीठात मोर्चा काढून घटनेचा निषेध केला.
कुलगुरुंचे घुमजाव
कुलगुरू हरिलाल मेनन यांनी सुऊवातीला पश्नपत्रिकेच्या चोरीबद्दल अद्याप कोणतीही रितसर तक्रार आलेली नाही, त्यामुळे ठोस पुराव्याअभावी कोणतीही कारवाई करणे योग्य नाही, असे सांगितले होते. मात्र तथ्य शोध समिती स्थापन करण्याची तयारी दाखविली होती. 48 तासांच्या आत आपला अहवाल समिती देईल. जर निष्कर्षांमध्ये काही गैरप्रकार आढळला तर आवश्यक ती कारवाई सुरू केली जाईल, असे त्यांनी आश्वासन दिले होते. त्यानुसार नंतर ही कारवाई झाली.
गोवा फॉरवर्डची मागणी
गोवा फारर्वड पार्टीचे दुर्गादास कामत यांनी साऱ्या प्रकारात राज्यपालांनी जातीने लक्ष घालून संशयित प्रध्यापकावर कारावई करावी, अशी मागणी केली होती. विद्यापीठात विद्यार्थी मेहनत करून भरपूर अभ्यास करून गुण मिळवतात आणि पुढली पायरी गाठतात असे प्रश्नपत्रिका मिळवून विद्यार्थी गुण मिळवू लागले तर सत्यमार्गाने अभ्यास करून गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यावर तो अन्याय आहे, असेही दुर्गादास कामत म्हणाले होते. विद्यापीठात झालेली नोकर भरती आणि अन्य काही प्रकारामुळे गोवा विद्यापीठ अगोदरच वादाच्या भोवऱ्यात आहे. हे विषय विधानसभेतही आले होते. आता नव्याने झालेल्या या प्रकाराचा सोक्षमोक्ष लावून कारवाई न केल्यास राजभवनसमोर बसावे लागेल, असेही ते म्हणाले.









