पंचम शिवलिंगेश्वर स्वामी : अंकलीत डॉ. कोरे यांच्या वाढदिनी कार्यक्रम
वार्ताहर /मांजरी
डॉ. प्रभाकर कोरे यांचा जन्मदिन हा सिंहावलोकन करण्याचा आहे. त्यांनी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून समाजातील अज्ञान दूर करण्याचे कार्य चालविले आहे. धर्म चिंतनातून साध्य करता येत नाही ते कोरे यांनी शिक्षण क्षेत्रातून केले आहे. शिक्षण क्षेत्रात इतिहास रचण्याचे कार्य त्यांच्याकडून होत आहे. मानवी मूल्ये जपत समाजाची सेवा त्यांच्याकडून घडावी. त्यांना दीर्घायुष्य लाभो, असे प्रतिपादन पंचम शिवलिंगेश्वर महास्वामी यांनी केले. अंकली येथे केएलईचे कार्याध्यक्ष, माजी खासदार, डॉ. प्रभाकर कोरे यांच्या 76 व्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमात ते बोलत होते. शिवशक्ती शुगर्स, चिदानंद कोरे साखर कारखाना, डॉ. प्रभाकर कोरे सौहार्द, हर्म्स डिस्टलरी प्रा. लि. व केएलई शिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमास पंचम शिवलिंगेश्वर महास्वामी, संपादन स्वामीजी, अमरसिद्धेश्वर महास्वामी यांचे दिव्य सानिध्य लाभले.
अध्यक्षस्थानी माजी आमदार महांतेश कवटगीमठ होते. उद्घाटक म्हणून दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील होते. प्रमुख पाहूणे म्हणून आमदार दुर्योधन ऐहोळे, आमदार राजू कागे, संस्थेचे संचालक बी. आर. पाटील, केएलई विश्वविद्यालय उपकुलपती डॉ. नितीन गंगाणे, डॉ. व्ही. डी. पाटील, डॉ. दयानंद, डॉ. एम. व्ही. जाली, डॉ. व्ही. ए. कोठीवाले, डॉ. श्रीकांत विरगी, दत्तचे संचालक अमर यादव, भरतेश बनवणे, चिदानंद कोरे कारखान्याचे उपाध्यक्ष तात्यासाहेब काटे उपस्थित होते. प्रास्ताविक डी. एस. करोशी यांनी केले. उद्घाटन स्वामीजी व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. कोरे यांचे कार्य दीपस्तंभाप्रमाणे असून आरोग्य, शिक्षण, सामाजिक, राजकीय असे सर्वांगीण क्षेत्रात कार्य करणारे व्यक्तिमत्व आहे. केएलई संस्थेच्या माध्यमातून 1 लाख 40 हजार विद्यार्थ्यांना शिक्षणाचा लाभ दिला जात आहे. समाजाला सामाजिक, आरोग्य, आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे कार्य केएलई संस्थेकडून केले जात आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांना उच्च व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत आहे. संस्थेने आरोग्य क्षेत्रातही नावलौकिक मिळविला आहे. विविध आरोग्य योजनांचा लाभ रुग्णांना मिळवून दिला आहे. अजातशत्रू व्यक्तिमत्व असलेले कोरे यांनी सर्व समाजाला उपयोगी पडेल असे कार्य पेले आहे, असे मान्यवरांनी सांगितले.
असंख्य रुग्णांना लाभ
डॉ. प्रभाकर कोरे यांच्या 76 व्या वाढदिवसानिमित्त केएलई संस्थेच्यावतीने रक्तदान शिबिर, मोफत आरोग्य तपासणी शिबिर तसेच वृक्षारोपण कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. या विविध सामाजिक उपक्रमास मोठा प्रतिसाद लाभला. याप्रसंगी केएलई संचालित विविध संस्था तसेच डॉ. प्रभाकर कोरे क्रेडिट सौहार्द संस्थेचे पदाधिकारी, अंकली परिसरातील असंख्य नागरिक उपस्थित होते. सलग तीन दिवस शेतकरी, महिला व नागरिकांसाठी विविध मार्गदर्शनपर कार्यक्रमांचे आयोजन करून मंगळवारी कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.









