प्रतिनिधी/ बेळगाव
दोन दिवसांपूर्वी जिल्हा रुग्णालयातील प्रसूती विभागात मृत्यू झालेल्या पूजा कडकभावी या महिलेच्या कुटुंबीयांची राज्य भाजपा महिला मोर्चा पदाधिकारी प्रदेश सचिव डॉ. सोनाली सरनोबत यांनी भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी त्यांच्यासोबत प्रदेश उपाध्यक्षा शांभवी अश्वत्थपूर उपस्थित होत्या.
गेल्या काही महिन्यांपासून बळ्ळारी येथील ‘बिम्स’सह बेळगाव सिव्हिल हॉस्पिटलमधील प्रसूती विभागात बाळंतिणी आणि नवजात अर्भकांचे सातत्याने मृत्यू होत आहेत. यावर्षी सिव्हिलमध्ये 120 अर्भक आणि 11 बाळंतिणींचा मृत्यू झाला आहे. बळ्ळारीमध्ये एकापाठोपाठ एक बाळंतिणींचा मृत्यू झाल्याने भाजपा कर्नाटक महिला मोर्चाच्यावतीने राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. तसेच दोन दिवसांपूर्वी कुंदरगी येथील पूजा कडकभावी या महिलेचाही सिव्हिलमध्ये मृत्यू झाल्याने आज भाजप महिला पदाधिकाऱ्यांनी कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी गोकाक भाजप मंडळ अध्यक्ष राजेंद्र गौडप्पगोळ, आनंद अतुगोळ, शिवानंद टोपगी यांच्यासह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.









