केंद्र सरकारकडून कुटुंबाला तीन जागांचा प्रस्ताव : ट्रस्टकडून प्रयत्न सुरू
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या स्मारकासाठी जागा निश्चित करण्यासाठीचे प्रयत्न केंद्र सरकारच्या नगर विकास मंत्रालयाने औपचारिकपणे सुरू केले आहेत. या अंतर्गत मनमोहन सिंग यांच्या कुटुंबीयांना जागा निवडण्यासाठी तीन पर्याय सुचवण्यात आले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय स्मारक स्थळ राजघाट, किसान घाट आणि समता स्थळ हे तीन पर्याय दिवंगत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कुटुंबियांना देण्यात आले असून त्यापैकी एक निवडण्यास सांगण्यात आले आहे. मनमोहन सिंग यांच्या स्मृतींना स्मारकाच्या रुपाने जपण्यासाठी ट्रस्ट स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती शहरी व्यवहार मंत्रालयाला मिळाल्यानंतर हा प्रस्ताव देण्यात आला आहे.
कुटुंबातील सदस्यच निर्णय घेतील
स्मारकासाठी दीड एकर जागा दिली जाणार आहे. मनमोहन सिंग यांच्या स्मरणार्थ स्थापन करण्यात येणाऱ्या ट्रस्टमध्ये कोण सामील होणार हे कुटुंबातील सदस्य ठरवतील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस पक्षाचे काही सदस्यही यात सहभागी असू शकतात, मात्र हा निर्णय पूर्णपणे मनमोहन सिंग यांच्या पत्नी गुरुशरण सिंग आणि त्यांच्या मुली घेतील. ट्रस्टच्या स्थापनेत पक्ष पूर्ण सहकार्य करेल. कुटुंबाने जागा निवडल्यानंतर पुढील कार्यवाही सुरू केली जाईल. मनमोहन सिंग यांचे स्मारक गांधी-नेहरू घराण्यातील सदस्यांच्या समाधीजवळ बांधले जाण्याची शक्यता आहे.
काँग्रेसचे मोदी-शहांना पत्र
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी 27 डिसेंबरच्या संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून डॉ. सिंह यांचे अंत्यसंस्कार जेथे होतील तेथे स्मारक बांधण्यात यावे, असे म्हटले होते. मात्र, गृह मंत्रालयाने निगमबोध घाटावर अंत्यसंस्कार केले होते. यावर काँग्रेसने नाराजी व्यक्त करत हा माजी पंतप्रधानांचा अपमान झाल्याचे म्हटले होते.









